World Cup 1983 : तो दिवसच एखादा असतो

संजय घारपुरे
Tuesday, 25 June 2019

1983 च्या जून महिन्यातील 25 तारखेने केवळ भारतीय क्रिकेटच बदलले नाही, तर भारतीय क्रीडा क्षेत्राची दिशाच बदलली. त्या स्पर्धेपासून भारतीयांसाठी विश्वकरंडक फक्त क्रिकेटचा झाला, क्रिकेट आणि अन्य खेळ ही विभागणी होण्याचे बीज त्यादिवशी रोवले गेले, म्हणतात ना एखादा दिवस असाच असतो.

1983 च्या जून महिन्यातील 25 तारखेने केवळ भारतीय क्रिकेटच बदलले नाही, तर भारतीय क्रीडा क्षेत्राची दिशाच बदलली. त्या स्पर्धेपासून भारतीयांसाठी विश्वकरंडक फक्त क्रिकेटचा झाला, क्रिकेट आणि अन्य खेळ ही विभागणी होण्याचे बीज त्यादिवशी रोवले गेले, म्हणतात ना एखादा दिवस असाच असतो. 

कोणीही भारत 1983 चा विश्वकरंडक जिंकेल अशी आशा बाळगली नव्हती. अगदी भारताचा डाव 183 धावात आटोपल्यावर किती षटकात विंडीज लक्ष्य गाठणार ही चर्चाच सुरु झाली होती. अगदी खर सांगायचे तर कपिलदेव सोडून कोणालाही भारत वेस्ट इंडिजला लढा देऊ शकतो असे वाटले नव्हते. आपणही त्यांना रोखू शकतो हा विश्वास भारतीय संघास खऱ्या अर्थाने दिला असेल, तर बलविंदर सिंग संधूच्या त्या चेंडूने. खर तर आता म्हटले जाते त्याप्रमाणे तो चेंडू भारतासाठी विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू ठरला होता. या चेंडूने संधूंना खऱ्या अर्थाने ओळख दिली. 

संधू आठ कसोटी आणि 22 एकदिवसीय लढती खेळले, पण त्या चेंडूव्यतिरीक्त संधूंची ओळख नाही हेही तितकेच खरे. गॉर्डन ग्रीनीजने तो खेळत असलेला बारावा चेंडू सोडला, पण त्याला काही समजण्यापूर्वीच तो यष्टींवर आदळला होता. त्यानंतर आपण काहीही करु शकतो हा विश्वास भारतीयांना आला. भारतीय क्रीडा क्षेत्रास त्यावेळी एखाद्या आंतरराष्ट्रीय यशाची नितांत आवश्यकता होती, भारतीय हॉकीची पिछेहाट सुरु झाली होती. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पाकिस्तानविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवाच्या जखमा जेमतेम भरल्या होत्या. त्या अपयशाने आपण खरच कुठे काही जिंकू शकतो अशी परिस्थिती झाली होती, पण 1983 च्या या विजेतेपदाने चित्रच बदलले. 

तो दिवसच वेगळा होता. भारतास त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध एवढ्या कमी धावा झाल्यावर क्वचितच यश लाभले असेल, ते यश होते, ते नेक्स्ट डोअर खेळाडूंचे, त्यामुळेच भारतीय क्रिकेट रसिकांना 2011 च्या विजेतेपदापेक्षाही 1983 चे विजेतेपद जास्त जवळचे वाटते. आपण जगाला धक्का देऊ शकतो असा विश्वास त्या यशाने दिला होता. 

खरच तो दिवसच भारताचा होता. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज लढत झाली ती श्रीनगरमध्ये. भारताने पुन्हा फलंदाजी घेतली, आणि धावाही झाल्या विश्वकरंडकातील अंतिम लढती एवढ्याच, अगदी नेमके सांगायचे तर 176. विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीने तोंड पोळलेल्या ग्रीनीज आणि हेन्सने कपिल आणि संधूची षटके शांतपणे खेळून काढल्यावर बिन्नी आणि मदनलाल यांच्यावर तुफानी हल्ला केला. ही लढत अपुऱ्या प्रकाशाचे कारण देऊन थांबवली गेली, पण ही लढत कोणाच्याही लक्षात नाही. अगदीच उल्लेख झाला तर त्या लढतीच्यावेळी कसे भारतविरोधी वातावरण होते. शेर ए काश्मीर स्टेडियममध्ये कसे इमरान खानचे छायाचित्र झळकवत जल्लोष केला जात होता, यासाठीच उदाहरण दिले जाते. विंडीजने पाच सामन्याची मालिका एकही सामना न गमावता जिंकली, त्यातल्या त्यात चुरस म्हणायची झाली तर बडोद्याच्या चार विकेटने मिळवलेल्या लढतीतच दिसते. पण या मालिकेचा इतिहास गुगल केल्याशिवाय कळत नाही, किंबहुना अशी काही मालिका भारत लगेच हरला हेही कोणाला माहीती नसते.

आत्ताच्या आधुनिक क्रिकेटच्या तुलनेत 183 धावांचे संरक्षणच स्वप्नवत वाटते आणि तेही 60 षटकांच्या लढतीत म्हणजे अतीच होईल. सामन्यातील वैयक्तिक सर्वोत्तम धावा 38 (कृष्णम्माचारी श्रीकांत) असतात, भारतीय डावातील एकाच फलंदाजांचा स्ट्राईक रेट शंभरपेक्षा जास्त होता (कपिलदेव 8 चेंडूत 3 चौकारांसह 15), अष्टपैलू कामगिरी केलेल्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट अवघा 32.50 (मोहिंदर अमरनाथ 80 चेंडूत 3 चौकारांसह 26) होता ही कल्पनाच आता ट्वेंटीच्या जमान्यात सहन होत नाही. 

आता हीच लढत हरलो असतो तर कदाचीत सध्याच्या जमान्यात कपिलदेव, मोहींदर अमरनाथ ट्रोल झाले असते, पण तो जमानाचा वेगळा होता. तेंव्हाचा अंतिम सामना अनेकांनी आपल्या शेजारच्या घरातील टिव्हीसमोर आठ तास ठिय्या धरुन पाहिला असेल, याचे टीव्ही असलेल्या घरास कौतुक वाटले असेल. टिव्ही असलेल्या घरातील व्यक्तींनीच भारत जिंकल्यावर घरातील साखर वाटली असेल. त्या विजेतेपदाचा इव्हेंट झाला नव्हता, तो एक आनंद सोहळा होता. म्हणतात ना एखादाच दिवस असा असतो.


​ ​

संबंधित बातम्या