राष्ट्रीय पुरस्कारांचे नियमित वाद

संजय घारपुरे
Monday, 24 September 2018

खेलरत्नचे गाजलेले वाद
अंजली भागवत वि. केएम बिनामोल
बिनामोलने २००२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आणि त्याच वेळी नेमबाज अंजली भागवत सातत्याने प्रभावी कामगिरी करीत होती. जागतिक क्रमवारीत अव्वल आली होती. बिनामोल की अंजली हा वाद सुरू झाला. एका वर्षी दोन खेलरत्न कसे? हा वादही रंगला. त्याचवेळी दर वर्षी खेलरत्न आवश्‍यकच आहे का? ही चर्चाही सुरू झाली. अखेर दोघींनाही हा पुरस्कार देण्यात आला. अर्थात, काही वर्षांनी एकाच वर्षात चौघेही या पुरस्काराचे मानकरी ठरले ही गोष्ट वेगळी.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात एकवेळ नियमितता राहणार नाही; पण त्याबाबतच्या वादंगात कमालीचे सातत्य आहे. दरवर्षी नव्या क्रीडापटूंचा गौरव होतो आणि त्याच वेळी अन्याय झाला हे सांगणारेही क्रीडापटू, मार्गदर्शक असतात. पुरस्कारात पारदर्शकता आणण्यासाठी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली समिती तयार होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वसंमत झालेल्या पुरस्कार निकषात असलेल्या त्रुटीही नजरेस येतात. क्रीडा मंत्रालयाने प्रत्येक कामगिरीसाठी गुण निश्‍चित केले, तरीही वाद होतच असतात.

नियमास अपवाद हे आलेच. ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिक पदक विजेत्यांना थेट पुरस्कार देण्याचेही ठरले; पण त्यातही अपवाद करण्यात आले. आता त्यातच शून्य गुण मिळालेला कोहली खेलरत्न झाला आणि बजरंग पुनिया ८० गुण मिळाल्यानंतरही खेलरत्नपासून वंचित राहिला हे जाहीर झाल्याने तर वाद वाढलाच आहे. बजरंग पुनिया न्यायालयात जाण्याच्या तयारीत होता. अखेर त्याची समजूत काढण्यात आली. या पुरस्कारासाठी त्याने थेट जागतिक स्पर्धेची पूर्वतयारी पणास लावली आहे. आता बजरंगचे उदाहरण काही नवीन नाही. गेल्या वर्षीचा जीवनज्योत सिंग यांना द्रोणाचार्य पुरस्कार नाकारल्याचा वाद अजूनही न्यायालयात आहे. त्याहीपेक्षा पॅराऑलिंपिकमध्ये पदक जिंकलेली पहिली महिला क्रीडापटू असूनही दीपा मलिकला क्रीडा पुरस्कार नाकारला गेला. त्यामुळे अधिक गोंधळ करणाऱ्या पुरस्कार निवड समितीने जास्तच वाद निर्माण केला. 

खेळातील कामगिरीचे कोणत्याही चौकटीत मूल्यमापन करणे अवघडच असते. जागतिक स्पर्धा, विश्वकरंडक स्पर्धा, बहुविध खेळांतील कामगिरी यानुसार गुण दिले जातात; पण तिरंदाजी आणि नेमबाजी या खेळात दर वर्षी चार विश्वकरंडक स्पर्धा होतात. आता त्यातील गुण जास्त होणार, तर दर दोन वर्षांनी होणाऱ्या अन्य खेळांतील खेळाडूंना जागतिक स्पर्धेतील गुण कमी मिळणार. 

आता बजरंग पुनियाच्या ८० गुणांची स्पर्धा अन्य खेळाडूंबरोबर नव्हे, तर कुस्तीगीरांबरोबरच होऊ शकते. मीराबाईचे गुणही बजरंगपेक्षा खूपच कमी आहेत, असा दावा केला जातो. गणिताचा विचार केला तर हे खरे असेलही; पण त्याचवेळी मीराबाई ही ऑलिंपिकमध्ये समावेश असलेल्या खेळातील सध्याची एकमेव जगज्जेती कार्यरत खेळाडू आहे. आता विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार देणे कितपत योग्य, यावर वाद होऊ शकतात; पण त्याला शून्य गुणच कसे. आता जर निकष हा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील खेळ हाच असेल, तर आत्ताचा विराट कोहलीचाच नव्हे, तर अगदी विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, पंकज अडवाणी यांचा खेलरत्न पुरस्कारही रद्द व्हायला हवा. आता ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद ही टेनिसमधील कामगिरीही क्रिकेटपटूंप्रमाणेच गृहीत धरली जात नसल्याचा आक्षेप आहे. हेच गोल्फबाबतच्या विविध स्पर्धा मालिकांबाबत आहे आणि बॅडमिंटनमधील विविध स्पर्धांतील यशाबद्दलही. आता एवढ्या त्रुटी असल्यावर पुरस्कार निवडीवरून वाद झाला नसता तरच नवल.

ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धेमधील यश नक्कीच मोलाचे आहे; पण त्यासाठी जागतिक स्पर्धेतील यश त्यापेक्षा कमी महत्त्वाचे असल्याचे कसे दाखवता येईल. जागतिक स्पर्धेतील पदकानंतरही अंजू बॉबी जॉर्जचे गुण कमी असल्याचे सांगत तिला पुरस्कार नाकारला जातो, त्या वेळी धक्का बसतो. त्याची भरपाई कशी होते. रिओ ऑलिंपिकमध्ये आठव्या आलेल्या संघाचा कर्णधार सरदार सिंग खेलरत्न पुरस्काराचा मानकरी होतो आणि पॅराऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता मेरिअप्पन थांगावेलू याला अर्जुन पुरस्कार दिला जातो, हे कसे स्वीकारणार. जागतिक गोल्फमध्ये चमक दाखवल्यानंतरही जीव मिल्खा सिंग पुरस्कारापासून वंचित राहतो. 

पुरस्काराचे वाद कायमच राहणार. खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय यशापेक्षा राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने जास्त कौतुक होणार असेल, त्यांना जास्त सुविधा मिळणार असतील. नोकरीत बढती मिळणार असेल, जास्त मोठी बक्षिसे मिळणार असतील, तर हे घडतच राहणार. देवेंद्र झाझरिया खेलरत्न पुरस्कार जिंकण्यापूर्वी त्याच्या यशाची किती दखल घेतली होती, त्याचे किती कौतुक झाले होते. त्याने हा पुरस्कार जिंकल्यावर त्याच्या यशाची महंती गायली जाते, हेच तर अपयश आहे. 

निवड समिती किती सक्षम
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड करणारी समिती सदस्यांना पुरस्काराच्या स्पर्धेत असलेल्या खेळाडूंची किती माहिती असते याबाबतही शंका घेतली जात आहे. आता समितीतील बहुतेक माजी खेळाडू, पुरस्कार्थींना त्यांच्या खेळातीलच जास्त माहिती असते; पण अन्य खेळाडूंच्या कामगिरीबाबत ते क्रीडा मंत्रालयाने तयार केलेल्या माहितीवरच अवलंबून असतात. आता समितीत पुन्हा स्थान मिळवण्यापूर्वी दोन वर्षांचा ब्रेक असावा असे ठरले आहे; पण या समितीतील क्रीडा खात्याचे पदाधिकारी बदलत नाहीत. त्यांना खेळाडूच्या बाजूने मत तयार करायचे की, विरोधात हे ठरवणे काही अवघड नसते. आता बैठकीपूर्वी हे पदाधिकारी पुरस्कारासाठी शिफारस असलेल्या खेळाडूंची सर्व माहिती समिती सदस्यांना पाठवतात. आता ही माहिती कितपत परिपूर्ण असते याबाबतही शंका आहे. खेलरत्न मिळालेल्या खेळाडूच्या महत्त्वाची कामगिरीचा उल्लेखच त्याच्या माहितीमध्ये नसल्याचे लक्षात आले. अनेकदा या बैठकीत आपल्या खेळातील क्रीडापटूंसाठी मोहीम राबवली जाते. त्यासाठी काही तडजोडीही होतात. याची दबक्‍या आवाजात चर्चा होत राहते. होय, या बैठकांचे रेकॉर्डिंग होते; पण त्याचा कोणाकडून काहीतरी आढावा घेतला जातो का? हा प्रश्नच आहे. हे सर्व रेकॉर्डिंग शास्त्री भवनातील क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयातील कोणत्यातरी कपाटात असेल. या बैठकीचे थेट प्रक्षेपण केले, तर वाद होणारच नाहीत. असे नाही तर ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल. किमान या पुरस्कार देण्याच्या निर्णयावरून झालेल्या वादावर समिती प्रमुखांनी उत्तरे दिली किंवा थेट चर्चा घडवून आणली तर... तर पर्याय अनेक आहेत; पण हे पुरस्कार पारदर्शक होण्यास किती वर्षे लागणार हे अनुत्तरीतच आहे.

मिताली राज मात्र नकोशी
विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारतास उपविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारताची कर्णधार मिताली राज हिला खेलरत्न नाकारण्यात आले. त्याच वर्षी भारतीय हॉकीचा स्टार सरदार सिंग याला निवडण्यात आले. आता मितालीची कामगिरी सरदारपेक्षा कुठे कमी पडली हे कोणीच काही बोलत नाही. कदाचित महिला क्रिकेट हा ऑलिंपिक खेळ नाही, हॉकी हा ऑलिंपिक खेळ आहे. त्यामुळे त्यातील यश मोलाचे असा दावा झाला असेल. आता विराट कोहली हा जागतिक फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल आहे. हा निकष धरून त्याच्या खेलरत्न पुरस्काराचे समर्थन होते. मग हाच न्याय महिला क्रिकेटमधील मितालीस का नाही? हा प्रश्‍न विचारणेही गैर लागू ठरते. कोहली कुस्तीगीर बजरंग पुनियापेक्षा सरस ठरतो; पण मिताली सरदारपेक्षा कमी होते. 

महेश भूपतीसाठी डबल फॉल्टच
खेलरत्न पुरस्कारांच्या यादीत लिअँडर पेस आणि सानिया मिर्झा आहेत; पण त्यात महेश भूपती नाही. भूपतीसह भारतास पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकून दिलेला पेस हा खेलरत्न होतो. मग भूपती का नाही, कदाचित पेसचे ऑलिंपिक पदक लक्षात घेतले असेल, मग सानिया मिर्झाला ऑलिंपिक पदक नसतानाही हा मान का देण्यात आला. या प्रश्नांच्या रॅलीजचे उत्तर भूपतीही देऊ शकणार नाही.

द्रविड, गांगुलीही दुर्लक्षित
भारतीय क्रिकेटने जागतिक स्तरावर दबदबा निर्माण केला. त्यात सचिन तेंडुलकरबरोबर राहुल द्रविड, सौरव गांगुलीचाही मोलाचा वाटा आहे. त्यातील सचिन खेलरत्नच नव्हे, तर भारतरत्नही झाला; पण द्रविड आणि गांगुली या यादीत नाहीत. भारतीय संघाचा समतोल साधण्यासाठी यष्टीरक्षणही करण्यास तयार झालेल्या द्रविडची तयारी दुर्लक्षित झाली; तसेच सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागला सलामीला खेळता यावे, अन्य फलंदाजांचा क्रमांक बिघडू नये यासाठी कर्णधार असतानाही खालच्या क्रमांकावर गेलेला, सट्टेबाज, निकाल निश्‍चिती प्रकरणाने ग्रासलेल्या भारतीय क्रिकेटला पुन्हा झळाळी देणारा नेता गांगुली यात कुठेच नाही.  

खेलरत्नचे गाजलेले वाद
अंजली भागवत वि. केएम बिनामोल
बिनामोलने २००२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आणि त्याच वेळी नेमबाज अंजली भागवत सातत्याने प्रभावी कामगिरी करीत होती. जागतिक क्रमवारीत अव्वल आली होती. बिनामोल की अंजली हा वाद सुरू झाला. एका वर्षी दोन खेलरत्न कसे? हा वादही रंगला. त्याचवेळी दर वर्षी खेलरत्न आवश्‍यकच आहे का? ही चर्चाही सुरू झाली. अखेर दोघींनाही हा पुरस्कार देण्यात आला. अर्थात, काही वर्षांनी एकाच वर्षात चौघेही या पुरस्काराचे मानकरी ठरले ही गोष्ट वेगळी.

रोंजन सोधी टार्गेट
२०१३ च्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोंजन सोधीची शिफारस झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा निर्णय निवड समितीसही पूर्ण मान्य नसल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू होती. रोंजनची शिफारस झाल्याचे समजल्यावर थाळीफेकीतील स्पर्धक कृष्णा पुनियाने टीकेचा भडिमार सुरू केला. पॅराऑलिंपिकमधील यशस्वी एचएन गिरीशा यांनीही अन्याय होत असल्याचा दावा केला. पुनियाने तर सर्व ताकदपणास लावली; पण रोंजनच अखेर मानकरी ठरला. 

पुन्हा एकदा गिरीशा 
दोन वर्षांनी म्हणजेच २०१५ च्या खेलरत्नसाठी गिरीशाने थेट न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी सानिया मिर्झाची शिफारस करण्यात आली होती. आपल्याला सर्वाधिक ९० गुण मिळाल्याचा गिरीशाचा दावाही टिकला नाही. त्याच्या सानियाच्या ग्रॅण्ड स्लॅम यशाला आपल्यापेक्षा कमी गुण मिळाल्याचा दावाही कोणाच्या कानावर पडला नाही. सानियालाच पुरस्कार देण्यात आला. 

पुरस्कार कोणाला नाही याचाही वाद
सानियाला पुरस्कार मिळण्यापूर्वी एक वर्ष अगोदरच्यावर्षी कोणालाच पुरस्कार मिळाला नाही. त्या वेळी पी. व्ही. सिंधू, विकास गौडा, कृष्णा पुनिया, जीव मिल्खा सिंग हे स्पर्धेत होते. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कपिलदेव हे जीव मिल्खा सिंगसाठी आग्रही होते; पण समितीने विरोध करीत हा प्रस्ताव हाणून पाडला आणि २००२ मध्ये दर वर्षी हा पुरस्कार कशाला, या मागणीची अखेर पूर्तता झाली.

वादंगाचेच तीर जास्त
राष्ट्रकुल कुस्ती ही कुस्ती स्पर्धांच्या दर्जांच्या उतरंडीत तळाला जाते. तरीही या स्पर्धेतील रौप्यपदकाबद्दल सत्यव्रत काडियन अर्जुन पुरस्कार विजेता.
 प्रशांती सिंगला बास्केटबॉलचा निरोप घेतल्यानंतर अर्जुन पुरस्कार, त्याच वेळी अमरज्योत सिंग दुर्लक्षित.
 आशिया ब गटात विजेतेपदाबद्दल सात वर्षांनी गीतू ॲना जोसला अर्जुन पुरस्कार
 ॲथलेटिक्‍समध्ये जवळपास १०० अर्जुन पुरस्कार विजेते; पण एकही ऑलिंपिक पदक नाही.
 २०१० मध्ये साईना नेहवालला दोन सुपर सीरिज विजेतेपदानंतर खेलरत्न. ही कामगिरी पुरस्काराची शिफारस पाठवण्याची मुदत संपल्यानंतर.
 ऑलिंपिक, पॅराऑलिंपिक पदक विजेत्यांना अर्जुन अथवा खेलरत्न देण्याची घोषणा; पण दीपा मलिकला कोणताच पुरस्कार नाही.
 दीपा कर्माकरला ऑलिंपिकमधील चौथ्या क्रमांकानंतरही खेलरत्न; पण याच दर्जाची कामगिरी तसेच जागतिक स्पर्धेतील यशानंतरही अतानू दासला अर्जुन पुरस्कार नाकारला.
 अनिल कुंबळेने एकाच डावात सर्व १० विकेट घेतल्यानंतरही त्याचा खेलरत्न पुरस्कारासाठी विचार नाही.
 ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी सात वर्षे अगोदरच अभिनव बिंद्रा खेलरत्न.


​ ​

संबंधित बातम्या