संजय बांगर यांनी घेतला निवड समितीशीच पंगा

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

कार्यकाळ संपलेले व्यवस्थापक सुनीन सुब्रमणियन आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजीच्या प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आलेल्या संजय बांगर यांच्या विरोधात अहवाल सादर केला तर बांगर यांची बीसीसीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप बांगर यांच्यावर करण्यात आलेला आहे. 

नवी दिल्ली : कार्यकाळ संपलेले व्यवस्थापक सुनीन सुब्रमणियन आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजीच्या प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आलेल्या संजय बांगर यांच्या विरोधात अहवाल सादर केला तर बांगर यांची बीसीसीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप बांगर यांच्यावर करण्यात आलेला आहे. 

फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी बांगर यांच्याऐवजी विक्रम राठोड यांची निवड निश्‍चित झाली आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात हॉटेल रूममध्ये देबांग गांधी आणि संजय बांगर यांच्यात वादावादी झाल्याची चर्चा आहे. 

या संदर्भात नियम अतिशय काटेकोर आहे. बांगर यांनी गैरवर्तन केलेली व्यक्ती निवड समितीची सदस्य आहे. परंतु त्यांनी अधिकृत तक्रार करणे आवश्‍यक आहे, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. सपोर्ट स्टाफ निवडीची जबाबदारी निवड समितीवर होती. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक कायम राहिले असून बांगर यांची गच्छंती करण्यात आली. बांगर आणि गांधी यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना सत्य असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले परंतु बांगर यांच्याबरोबरचा करार संपलेला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते ही बाब सुद्धा तपासावी लागेल असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

कोणताही दौरा संपल्यानंतर व्यवस्थापकांना प्राथमिक अहवाल बीसीसीआयला सादर करावा लागतो. मात्र सुब्रमणियन यांनी त्यांच्या अहवालात बांगर-गांधी यांच्यातील बाचाबाची प्रसंगाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर रवी शास्त्री यांनीही अहवाल दिला तर बांगर यांची चौकशी केली जाऊ शकेल, जर हे सगळे मुद्दे नसतील तर हे प्रकरण प्रशासकीय समितीसमोरही जाणार नाही, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या