सांगलीच्या रणजितने टिपले 26 बळी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 February 2019

महाराष्ट्राचा जलदगती रणजित चौगुले याने 19 वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून एकूण आठ सामन्यांत तब्बल 26 बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. रणजित भारतीय क्रिकेट संघाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

सांगली : रणजित चौगुलेच्या रूपाने सांगलीचे भारतीय क्रिकेटच्या नकाशात नाव झळकेल याबद्दल सर्वांनाच खात्री आहे. गेली तीन वर्षे तो महाराष्ट्र संघाकडून चांगली कामगिरी करीत आहे. 16 वर्षांखालील महाराष्ट्र संघात त्याची पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर त्याने गेल्यावर्षी वयाच्या 16 व्या वर्षीच 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. यंदाही त्याने 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघात पुन्हा स्थान मिळवताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

गेल्या 19 नोव्हेंबरपासून कूच बिहार ट्रॉफी स्पर्धा सुरू होत्या. लिगमध्ये प्रत्येकी चार दिवसांच्या एकूण आठ मॅचेस होत्या. या आठ पैकी पाच आणि उपांत्यपूर्व आणि उपांत्या अशा एकूण सात मॅचेसमध्ये रणजित चौगुलेला महाराष्ट्राकडून आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्याने दिल्ली विरोधात 3, मुंबई विरोधात 7, बडोद्या विरोधात 3, उत्तर प्रदेश विरोधात 1, विदर्भा विरोधात 5, केरळ विरोधात 1, आणि पुन्हा सेमीफायनलला विदर्भ विरोधात 6 बळी घेऊन महाराष्ट्राकडून त्याने 26 बळी टिपले. त्याला पहिल्या तीन सामन्यांना संधी मिळाली असते तर त्याने किमान चाळीस ते पंच्चेचाळीस बळी टिपले असते. आता तो महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची 16 वर्षांखालील वयोगटाप्रमाणेच पुन्हा एकवार नॅशनल क्रिकेट अकॅडमी 19 वर्षांखालील वयोगटामध्ये निवडीचा त्याचा मार्ग खुला झाला आहे.

रणजित सध्या पुण्यात येथे आर्यन्स अकॅडमी आणि सांगली येथे राकेश उबाळे क्रिकेट अकॅडमीत सराव सुरू असतो. आर्यन्सचे हर्षद पाटील संदेश जाधव यांचे, तर राकेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ही घौडदौड सुरू आहे. पुढील वर्षी 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघातून खेळण्याचे रणजितचे ध्येय्य आहे. पुढील आठवड्याभरात 19 वर्षांखालील भारतीय संघाची निवड जाहीर होणार आहे. त्यानंतर सराव शिबिरात त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा तसेच भारतीय क्रिकेट संघातील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या