ऑलिंपिक पात्रतेसाठी साक्षी संघाबाहेरच

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

प्रत्येक स्पर्धेपूर्वी, तसेच स्पर्धेनंतर साक्षी मलिक आपल्याला निवड चाचणीची संधी देण्यासाठी आग्रह करीत असे, पण सलग दुसऱ्या चाचणीत साक्षीला निर्णायक लढतीत सोनम मलिकविरुद्ध हार पत्करावी लागली.

मुंबई / नवी दिल्ली : प्रत्येक स्पर्धेपूर्वी, तसेच स्पर्धेनंतर साक्षी मलिक आपल्याला निवड चाचणीची संधी देण्यासाठी आग्रह करीत असे, पण सलग दुसऱ्या चाचणीत साक्षीला निर्णायक लढतीत सोनम मलिकविरुद्ध हार पत्करावी लागली.

रोम जागतिक मानांकन स्पर्धा, तसेच आशियाई स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी निवड चाचणी घेतली. लखनौतील या चाचणीतील 62 किलो गटात साक्षी 18 वर्षीय सोनमविरुद्ध पराजित झाली. सोनमने वयास साजेशी कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत 59 किलो गटात सुवर्णपदक जिंकलेल्या सरिता मोर हिला 3-1 असे उपांत्य फेरीत हरवले. त्यानंतर साक्षीविरुद्ध निर्णायक विजय मिळवला. खरं तर सोनमने दुसऱ्या डावात साक्षीला चीतपट केले, त्यापूर्वी ती 1-2 अशी मागे होती आणि लढतीतील एक मिनिटच शिल्लक होते.

साक्षीला चीतपट करणे ही सोपी कामगिरी नाही. सोनम थकली होती. तसेच तिच्या कोपराला रोम स्पर्धेच्या वेळी झालेली दुखापतही त्रास देत होती. अनेकींना आपण सोनमला सहज हरवू, असेच वाटले असेल; पण मी तिला एक सांगितले होते, जर या स्पर्धकांविरुद्ध जिंकशील तरच तुझी भविष्यात प्रगती होईल. तिने नक्कीच माझी शान उंचावली आहे.
- अजमेर मलिक, सोनम मलिकचे मार्गदर्शक.

सोनम जिंकलेल्या 62 किलो गटाच्या चाचणीत दोन वर्षांपूर्वी जागतिक स्पर्धेत ब्रॉंझ जिंकलेली पूजा धांदाही सहभागी होती, तसेच जास्त वजनी गटातील स्पर्धकही होते. मात्र, सोनमच त्यांच्यात सरस ठरली. यापूर्वीची चाचणी जिंकलेली सोनम आशियाई स्पर्धेत पाचवी होती. त्यामुळे 62 तसेच 76 किलो गटासाठी चाचणी घेण्याचे ठरले. किरणने 76 किलो गटाची स्पर्धा जिंकली.

 


​ ​

संबंधित बातम्या