साकेत मयनेनीचे संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
Tuesday, 6 August 2019

एकेरी आणि दुहेरीतही खेळू शकणाऱ्या साकेत मयनेनीचे भारतीय डेव्हिस करंडक टेनिस संघात पुनरागमन झाले आहे.

नवी दिल्ली - एकेरी आणि दुहेरीतही खेळू शकणाऱ्या साकेत मयनेनीचे भारतीय डेव्हिस करंडक टेनिस संघात पुनरागमन झाले आहे. आशिया ओशियाना गट १च्या पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय टेनिस संघटनेने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. 

या लढतीसाठी भारतीय टेनिस संघटनेने अनुभवाला पसंती दिली असून, कुठलाही आश्‍चर्यकारक निर्णय घेतला नाही. एकेरी आणि दुहेरीत अव्वल असणाऱ्या खेळाडूंनाच संधी दिली आहे. 

एकेरीसाठी निवड समितीने प्रज्ञेश गुणेश्‍वरन आणि रामकुमार रामनाथन यांना पसंती दिली असून, रोहन बोपण्णा, दिवीज शरण यांना दुहेरीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ही लढत १४ आणि १५ सप्टेंबर रोजी इस्लामाबाद येथे ग्रास कोर्टवर खेळविली जाणार आहे. या लढतीमधील विजेता संघ पुढील वर्षी जागतिक गटाच्या पात्रता फेरीत खेळेल. दुखापतीने सुमीत नागल याने आपली अनुपलब्धता कळविल्याने रोहित राजपाल यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने साकेत मयनेनीची निवड केली. उदयोन्मुख गुणवान टेनिसपटू शशी कुमार मुकुंद याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.  

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात इटली विरुद्ध झालेल्या लढतीसाठी साकेतचा संघात समावेश नव्हता. सर्बियाविरुद्ध २०१८ मध्ये झालेल्या लढतीसाठी त्याचा संघात समावेश होता. त्यानंतर तो प्रथमच भारतीय संघात दाखल होणार आहे. साकेतने गेल्याच आठवड्यात अर्जुन कढेच्या साथीत चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे. मात्र, या मोसमात त्याला एकेरीत चमक दाखवता आलेली नाही. चॅलेंजरच्या एकूण चौदा स्पर्धांपैकी केवळ एकाच स्पर्धेत त्याला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली आहे. 

जागतिक क्रमवारीत भारताचा प्रज्ञेश ९०व्या स्थानावर असून, रामकुमारचे १८४ आणि मयनेनीचे २७१वे स्थान आहे. भारतीय टेनिस संघटनेने या लढतीसाठी पाकिस्तानात जाण्याची तयारी दर्शविली असली, तरी अजून केंद्र सरकारकडून या दौऱ्यासाठी परवानगी मिळालेली नाही. 

संघ - प्रज्ञेश गुणेश्‍वरन, रामकुमार रामनाथन, साकेत मयनेनी, रोहन बोपण्णा, दिवीज शरण
कर्णधार - महेश भूपती, प्रशिक्षक - झीशान अली.

संबंधित बातम्या