Schoolympics 2019 : सुसंस्कार, दानोळी, घोडावत, लोहिया विजयी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

कोल्हापूर - सुसंस्कार, दानोळी, संजय घोडावत इंटरनॅशनल, एस. एम. लोहिया, सेंट झेवियर्स, विबग्योर व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने प्रतिस्पर्ध्यांना क्रिकेट सामन्यांत आज पराभूत केले. हनुमंतराव चाटे स्कूलला प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल मिळाली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर चाटे स्कूलने (सेकंडरी) १० षटकांत ४३ धावांचे आव्हान सुंस्कार हायस्कूलसमोर ठेवले. त्यांचे तीन गडी बाद झाले. आर्यन पाटीलने नाबाद १२ धावा केल्या. सुसंस्कारकडून प्रथमेश साठेने दोन गडी बाद केले. सुसंस्कारने ५ षटके व तीन चेंडूत ४४ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे दोन गडी बाद झाले. करण वाघमोडेने नाबाद २२ धावा केल्या. त्याने तीन चौकार ठोकले. चाटे स्कूलकडून अमीर मुजावरने दोन गडी बाद केले. 
दानोळी हायस्कूलने १०५ धावांचे तगडे आव्हान सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलसमोर ठेवले. अनिकेत पोवारने नाबाद ४० धावा केल्या. त्याने चार चौकार मारले. सेव्हंथ डेकडून अंशूमन देसाईने एक गडी बाद केला. सेव्हंथ डेला एक गडी गमावून १०० धावा करता आल्या. त्यांच्या प्रथम नागदेवने २८ धावा केल्या.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) ९ षटकांत तीन गडी गमावून ७९ धावा केल्या. आर्यन फडकेने ३३ धावा केल्या. त्याने चार चौकार ठोकले. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या अथर्व पवारने एक गडी बाद केला. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने ९ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ८३ धावा केल्या. एकलव्य खाडेने नाबाद २८ धावांचे योगदान दिले. घोडावत स्कूलकडून अमोघ देसाईने दोन गडी तंबूत परतवले. 
कोल्हापूर पब्लिक स्कूला तीन गडी गमावून ५७ धावा करता आल्या. देव थोरातने नाबाद ३० धावा केल्या. एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजकडून अथर्व शिंदेने एक गडी बाद केला. एम. एम. लोहिया हायस्कूलने ६ षटके व तीन चेंडूत ५८ धावा फटकावून सामना जिंकला. प्रथम सावनूरने २४ धावा केल्या. कोल्हापूर पब्लिककडून आयुष अवघडेने दोन गडी बाद केले. 

कागलच्या शाहू स्टेडियममध्ये तवनाप्पा पाटणे हायस्कूलने पाच गडी गमावून ५१ धावा केल्या. रोहित मानगावकरने २३ धावा केल्या. सेंट झेवियर्स हायस्कूलच्या वरद खाडेने दोन गडी तंबूत परतवले. सेंट झेवियर्सने ७ षटके पाच चेंडूत ५३ धावा फटकाविल्या. विनायक कोळेकरने नाबाद ३९ धावा केल्या. पाटणे हायस्कूलकडून सुयश सोळोखेने दोन गडी बाद केले. 
विबग्योर हायस्कूलने ८४ धावा केल्या. त्यांचे तीन गडी बाद झाले. चिराग निरंकारीने ३२ धावा केल्या. संजीवन पब्लिक स्कूलच्या वेदांत चिखलकरने एक गडी बाद केला. संजीवनला पाच गडी गमावून ६५ धावांपर्यंत मजल मारता आली. अथर्व शिंदेने २८ धावा केल्या. विबग्योरकडून कृष्णम झंवरने दोन गडी बाद केले. 

छत्रपती शाहू विद्यालयाने (एसएससी) पाच गड्यांच्या मोबदल्यात ७० धावा केल्या. वेदांत चव्हाणने नाबाद ३१ धावा केल्या. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या अथर्व पोवारने एक गडी बाद केला. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने ७ षटके दोन चेंडूत ७२ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या पार्थ दळवीने ४१ धावा केल्या.


​ ​

संबंधित बातम्या