Schoolympics 2019 : दानोळी, घोडावत, लोहिया चाटे विजयी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

विबग्योर, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलनेही प्रतिस्पर्ध्यांना हरविले.

कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दानोळी हायस्कूलने चाटे स्कूलवर (सेकंडरी) सात गडी राखून मात केली. चाटे स्कूलने १० षटकांत चार गडी गमावून ७० धावा केल्या. 
 

कोल्हापूर, ता. २१ : मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत क्रिकेट स्पर्धेत दानोळी, संजय घोडावत इंटरनॅशनल (सीबीएसई) व एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हनुमंतराव चाटे, विबग्योर, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज हरविले. प्रतिस्पर्धी संघ न आल्याने सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलला विजयी घोषित करण्यात आले. ‘विबग्योर’च्या राचित चौगुलेने नाबाद ७६ धावा व दोन गडी, तर ‘एस. एम. लोहिया’च्या प्रथमेश सावनूरने ४९ धावा व दोन गडी बाद करत आजचा दिवस गाजवला. 

कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दानोळी हायस्कूलने चाटे स्कूलवर (सेकंडरी) सात गडी राखून मात केली. चाटे स्कूलने १० षटकांत चार गडी गमावून ७० धावा केल्या. त्यांच्या अथर्व लाडने २६ चेंडूंत २४ धावा केल्या. दानोळीकडून सुमित तावडेने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल दानोळी हायस्कूलने ८.३ षटकांत तीन गडी गमावून ७८ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या पारस यादवने २३ चेंडूंत ३३ धावा केल्या. त्यात चार चौकार व एका षट्‌काराचा समावेश होता. चाटे स्कूलकडून वासीम मुल्लाणीने एक गडी तंबूत परतवला. 
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने १० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावांचे आव्हान कोल्हापूर पब्लिक स्कूलसमोर ठेवले. त्यांच्या ऋषीकेश ठक्करने नाबाद ३५ धावा केल्या. कोल्हापूर पब्लिककडून देव थोरातने दोन गडी बाद केले. कोल्हापूर पब्लिकला १० षटकांत सहा गडी गमावून ४६ धावा करता आल्या. जुनैद मलबारीने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. घोडावत स्कूलकडून आदित्य जांभळेने दोन गडी बाद केले. 

एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने १०६ धावा केल्या. त्यांचा केवळ एक गडी बाद झाला. प्रथम सावनूरने ३० चेंडूंत ४९ धावांची खेळी केली. त्याने सहा चौकार व एक षट्‌कार मारला. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलकडून आरोहन चौगलेने १ गडी बाद केला. 

आयर्विन ख्रिश्‍चनच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग करण्यात कसूर केली नाही. मात्र, त्यांना १० षटकांत पाच गडी गमावून ९४ धावाच करता आल्या. अभिजित निशादने २३ चेंडूंत ३२ धावा केल्या. एस. एम. लोहिया हायस्कूलकडून प्रथम सावनूरने गोलंदाजीतही कमाल करत दोन गडी बाद केले. 

कागलच्या शाहू मैदानावर तवनाप्पा पाटणे हायस्कूलने ९ षट्‌कांत ५३ धावा केल्या. हनुमंतराव चाटे स्कूलकडून आर्यन वर्माने दोन गडी बाद केले. हनुमंतराव चाटे स्कूलने ८ षटके एका चेंडूत ५५ धावा केल्या. त्यांच्या दर्शन पाटीलने २९ धावा केल्या. विबग्योर हायस्कूलने दोन गडी गमावून १०४ धावा ठोकल्या. राचित चौगुलेने ४० चेंडूंत नाबाद ७६ धावांची जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तब्बल अकरा चौकार व एक षट्‌कार ठोकला. छत्रपती शाहू विद्यालयाला (एसएससी) १० षटकांत ३६ धावा करता आल्या. विबग्योरकडून राचित चौगुलेने दोन गडी बाद केले. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने १० षटकांत २ बाद ९४ धावा केल्या. पार्थ दळवीने २३ चेंडूंत ४४ धावा फटकाविल्या. संजीवन पब्लिक स्कूलचा डाव ६६ धावांवर आटोपला. प्रणव घोगरेने ३७ धावा केल्या. न्यू मॉडेलकडून अथर्व पोवारने तीन गडी बाद केले.


​ ​

संबंधित बातम्या