#HockeyPunishment क्रीडा प्रबोधिनीतून ‘ती’चे निलंबन मागे

टीम ई सकाळ
Wednesday, 5 June 2019

मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत भारतीय संभाव्य संघातील एका विद्यार्थिनी खेळाडूला क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द घडविण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या "ती'ला अखेर न्याय मिळाला.

पुणे : मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करत भारतीय संभाव्य संघातील एका विद्यार्थिनी खेळाडूला क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द घडविण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या "ती'ला अखेर न्याय मिळाला. "सकाळ'ने सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर अनेक स्तरांवरून या निर्णयाचा निषेध करण्यात आला होता. क्रीडा आयुक्त म्हणून नव्याने रुजू झालेल्या ओमप्रकाश बकोरिया यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेत तिच्या निलंबनाचा निर्णय मागे घेण्याचे आदेश दिले. 

फलटण तालुक्‍यातील कोळकी या अत्यंत दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थिनीने आपल्या मेहनत आणि कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर "इंडिया कोअर' संघात स्थान मिळाले होते. बंगळूर येथे झालेले पहिले शिबिर संपवून प्रबोधिनीत परतल्यावर तिच्या हातात क्रीडा प्रबोधिनीतून निलंबित केल्याचे पत्र पडले. अचानक झालेल्या या आघाताने ती कोलमडून पडली होती. क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील यांनी तिची बाजू न ऐकताच एकतर्फी निर्णय घेतला होता. मात्र, "सकाळ'मधून या प्रकरणाला वाचा फुटल्यावर अनेकांनी क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्यांचा निषेध केला होता. "हॉकी महाराष्ट्र'नेदेखील तिची बाजू लावून धरत क्रीडा आयुक्त बकोरिया यांची भेट घेतली होती. खेळाशी जवळचा संबंध असलेल्या बकोरिया यांनी तिची बाजू ऐकून घेत तिचा प्रबोधिनीतील प्रवेश कायम करण्याचे आदेश दिले. 

मित्राशी बोलली म्हणून 'तिची' क्रीडा प्रबोधिनीतून हकालपट्टी

एक निरपराध खेळाडूला वेळीच न्याय मिळाला नसता, ती मुलगी डागाळलेलं आयुष्य घेऊन जगली असती. आता तिला प्रबोधिनीत पुन्हा प्रवेश मिळाल्यामुळे ती ग्राउंडवर खेळू शकेल; तसेच तिची शैक्षणिक कारकीर्ददेखील घडू शकेल, अशी प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींनी व्यक्त करून "ती'ला क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

'तिला' न्याय मिळावा, म्हणून जोरदार प्रयत्न

संबंधित बातम्या