अरे या सिंधूला झालेय तरी काय?

संजय घारपुरे
Thursday, 6 June 2019

सिडनी : भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. तिला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. तिच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही आटोपले आहे. 

सिडनी : भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. तिला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. तिच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही आटोपले आहे. 

ऑलिंपिक तसेच जागतिक उपविजेत्या सिंधूला यंदा विजेतेपद दूरावतच आहे तसेच तिला प्रसंगी तिच्यापेक्षा खालचे मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध हार पत्करावी लागत आहे. यावेळीही हेच घडले. जागतिक क्रमवारीत सिंधू पाचवी आहे, तर तिला हरवलेली थायलंडची निचॉन सिंधू 29 व्या स्थानावर आहे. दोघीतील यापूर्वीच्या सहा लढतीत सिंधू एकदाच पराजित झाली होती. तो पराभव 2016 च्या जानेवारीत होता आणि तोही तीन गेममध्येच. पण यावेळी तिला 19-21, 18-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. 

सतत बदलणाऱ्या आघाडीत सिंधूला वर्चस्व राखता आले नाही हेच म्हणावे लागेल. तिने 1-5 पिछाडीवरुन 11-9 आघाडी घेतली, पण ती पुन्हा 12-16 मागे पडली. सिंधूने आपण काय करु शकतो हे दाखवताना सलग पाच गुण घेत 17-16 आघाडी घेतली, पण या निर्णायक टप्प्यात दोनदा सलग दोन गुण गमावत गेम गमावला. 19-19 बरोबरी असताना. दुसऱ्या गेममध्ये फार वेगळे घडले नाही. 3-0 आघाडीनंतर 5-8 मागे पडली. एवढेच नव्हे तर 14-11 आघाडी असताना सलग सात गुण गमावले. त्यानंतर अचानक जागे झालेल्या सिंधूने पिछाडी 17-18 कमी केली, पण त्यानंतर तिला एकही गुण जिंकता आला नाही. 49 मिनिटांच्या लढतीत मोक्‍याच्यावेळी सिंधूने गमावलेले गुण जास्त सलणारे होते. 

सिंधू पराजित होण्यापूर्वी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि बी साई प्रणीत तर पुरुष दुहेरीच सात्विकसाईराज रांकिरेड्डी - चिराग शेट्टीला हार पत्करावी लागली होती. काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेल्या वॅंग झु वेई याला दोन गेममध्ये लढवल्याचेच समाधान समीर वर्माला लाभले. समीर 16-21, 21-7, 13-21 असा पराजित झाला. प्रणीतने द्वितीय मानांकित अँथनी सिनीसुका गिनतिंग याला 42 मिनिटे लढत दिली. प्रणीत 23-25, 7-25 असा पराभूत झाला. लि जुनहु - लु युचेन या द्वितीय मानांकित जोडीने सात्विक - चिरागला 21-19, 21-18 असे हरवले. 

संबंधित बातम्या