ऑल इंग्लंड बॅडमिंटन : साईना, श्रीकांतला अखेरची संधी?

वृत्तसंस्था
Wednesday, 11 March 2020

जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंडमधील भारतीयांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा बाळगली जात असतानाच साईना नेहवाल तसेच किदांबी श्रीकांतला ऑलिंपिक पात्रतेच्या आशा उंचावण्यासाठी ही अखेरची संधी मानली जात आहे.

मुंबई/लंडन : जगभरात कोरोनाची लागण पसरत असताना बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेकडे असेल. जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंडमधील भारतीयांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा बाळगली जात असतानाच साईना नेहवाल तसेच किदांबी श्रीकांतला ऑलिंपिक पात्रतेच्या आशा उंचावण्यासाठी ही अखेरची संधी मानली जात आहे.

महत्त्वाच्या स्पर्धेत सिंधूची कामगिरी उंचावते, हा इतिहास सोडल्यास सिंधूने फारशा आशा निर्माण केलेल्या नाहीत. जागतिक विजेतेपदानंतर तिची कामगिरी खालावलीच आहे. बॅडमिंटन लीगमध्येही ती अपयशी ठरली. त्यातच ऑल इंग्लंडमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीही पार करता आलेली नाही. त्यातच तिच्यासाठी स्पर्धेचा ड्रॉही खडतर आहे.

सिंधूची सलामीला लढत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या बेईवान झॅंग हिच्याविरुद्ध आहे. सिंधूची झॅंगविरुद्ध 5-4 हुकूमत आहे. आता ही लढत जिंकली, तर सिंधूचा सामना सुंग जी ह्यूनविरुद्ध अपेक्षित आहे. सुंगने गेल्या वर्षी सिंधूला पहिल्याच फेरीत हरवले होते. एवढेच नव्हे तर तिने सिंधूविरुद्धच्या गेल्या तीनही लढती जिंकल्या आहेत. बर्मिंगहॅमची कमी वेगवान कोर्ट सिंधूची डोकेदुखी ठरतात.

साईना आणि श्रीकांतसाठी ही स्पर्धा ऑलिंपिकच्या पात्रतेसाठी मोलाची आहे. या स्पर्धेत सुरुवातीस हरल्यास त्यांच्या टोकियोच्या आशाच संपतील; पण त्याच वेळी उपांत्यपूर्व फेरी गाठली, तरी आशा उंचावतील, असे मानले जात आहे. दोघांसमोरील सलामीचे आव्हान चांगलेच खडतर आहे. साईनाची सलामीची प्रतिस्पर्धी जागतिक क्रमवारीत तिसरी असलेली अकेन यामागुची आहे; तर श्रीकांत दोन वेळच्या विजेत्या चेन लॉंग याला आव्हान देईल. साईनाने यामागुचीविरुद्धच्या दहापैकी दोनच लढती जिंकल्या आहेत, तर श्रीकांतने चेनविरुद्धच्या आठपैकी दोन.

काही बॅडमिंटन अभ्यासकांच्या मते श्रीकांतच्या तुलनेत लक्ष्य सेनला पात्रतेची जास्त संधी आहे. या 18 वर्षीय खेळाडूत सर्वाधिक सातत्य आहे. अर्थात ली चेऊक यिऊ आणि त्यापाठोपाठ व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन लक्ष्यच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत.

जागतिक ब्रॉंझ विजेता प्रणीतची ऑलिंपिक पात्रता जवळपास निश्‍चित आहे. ऑल इंग्लंडमध्ये त्याचा खेळ बहरतो; मात्र त्यालाही ड्रॉ सोपा नाही. माजी विजेता शी युक्वी याच्याविरुद्ध प्रणीतची दुसऱ्या फेरीत लढत होऊ शकेल. युक्वीचा सूर सध्या हरपला आहे, ही प्रणीतसाठी जमेची बाब आहे. पारुपली कश्‍यप काही धक्कादायक निकाल नोंदवेल, असे मानले जात आहे.

प्रकाश, गोपीनंतरची प्रतीक्षा कायम
प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांनीच यापूर्वी ऑल इंग्लंड जिंकली आहे. साईना नेहवालने 2015 च्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती; पण 2001 मधील गोपीचंदच्या विजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती त्यानंतर झालेली नाही. यंदाही ही प्रतीक्षा संपण्याची शक्‍यता कमीच दिसत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या