साईनाला या वेळी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकण्याची संधी : विमल कुमार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 January 2019

 साईना नेहवाल यंदाच्या मोसमात अधिक आत्मविश्‍वासाने खेळत आहे. मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्या ती अधिक कणखर ठरत आहे. याच जोरावर तिला या वेळी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची संधी असल्याचे मात तिचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले आहे. 

नवी दिल्ली : साईना नेहवाल यंदाच्या मोसमात अधिक आत्मविश्‍वासाने खेळत आहे. मुख्य म्हणजे मानसिक दृष्ट्या ती अधिक कणखर ठरत आहे. याच जोरावर तिला या वेळी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची संधी असल्याचे मात तिचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले आहे. 

साईनाला गेल्यावर्षी दुखापतीने त्रस्त केले होते. मात्र, या मोसमात ती अधिक सरस खेळ करत आहे. विमल कुमार म्हणाले,""गेल्यावर्षीच्या अपयशी मोसमाने साईनाला कणखर बनवले आहे. ती मानसिकदृष्ट्या खंबीर झाली आहे. विशेष म्हणजे पुरुष खेळाडूंपेक्षा ती अधिक सरस वाटत आहे. त्यामुळेच मला यंदाच्या मुख्य स्पर्धेत तिच्याकडून चांगली कामगिरी होईल अशी खात्री आहे.'' 
साईना कोर्टवर उतरली की फारसा विचार करत नाही. कोर्टच तिचे सर्वकाही असते. कोर्टबाहेरील सर्व ती विसरून प्रतिस्पर्ध्याला झुंजवताना दिसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

अर्थात, साईना अजून शंभर टक्के तंदुरुस्त नाही हे सांगायला विमल कुमार विसरले नाहीत. ते म्हणाले,""सध्या ती चांगली कामगिरी करत आहे. तिच्या काही लढती मी पाहिल्या. खेळताना मध्येच तिला दुखापतीने ग्रासल्याचे दिसून येते. मात्र, केवळ कणखर मानसिकतेनेच ती त्यावर मात करत आहे. तिने आपली शारीरिक क्षमता अधिक वाढवल्यास ती तई त्झु यिंग आणि कॅरोलिना मरिन यांच्याप्रमाणे वेगवान खेळ करू शकेल.''

संबंधित बातम्या