Asian Games 2018 : साईना, सिंधूचे पदक पक्के; उपांत्य फेरीत ऐतिहासिक धडक

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारतीय बॅडमिंटनच्या फुलराणींनी आशियाई क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीसह त्यांनी महिला एकेरीतील भारताचे पहिले ऐतिहासिक पदक निश्‍चित केले.

जकार्ता : साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारतीय बॅडमिंटनच्या फुलराणींनी आशियाई क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीसह त्यांनी महिला एकेरीतील भारताचे पहिले ऐतिहासिक पदक निश्‍चित केले.

ऑलिंपिक आणि जागतिक उपविजेत्या सिंधूने थायलंडच्या निचॉन जिंदापॉल हिचे आव्हान 21-11, 16-21, 21-14 असे परतवले. त्यापूर्वी राष्ट्रकुल विजेत्या सिंधूने भारताचा वैयक्तिक पदकाचा 36 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या असलेल्या रॅचनॉक इनाथॉन हिचा 21-18, 21-16 असा पराभव करून किमान ब्रॉंझ निश्‍चित केले. 1982 च्या दिल्ली स्पर्धेत सय्यद मोदी यांनी वैयक्तिक पदक जिंकले होते. त्यानंतर प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटू एशियाडमध्ये पदक जिंकेल. भारताने जिंकलेल्या सहा बॅडमिंटन पदकांपैकी सहा सांघिक, तर एक पुरुष दुहेरीतील आहे. दरम्यान, सिंधूसमोर जपानच्या अकेन यामागुची हिचे, तर साईनासमोर चीनच्या ताई झु यिंग हिचे आव्हान असेल.

साईना 42 मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सुरुवातीस 3-8, 3-12 मागे होती. पण, तिने इनचॉनविरुद्धची यशोमालिका कायम राखण्यात यश मिळवले. साईनाचा धडाका सुरू झाल्यावर इनचॉनचा प्रतिकार कमी पडला. खेळातील चढाउतारामुळे सिंधूला तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले. दुसऱ्या गेमचा अपवाद सोडला, तर सिंधूचे वर्चस्व जबरदस्त होते. तिने किमान तीनदा सलग पाच गुण जिंकण्यात यश मिळवले.

यापूर्वी कोणी पदक जिंकले, याची गोपी सरांबरोबर चर्चा सुरू होती, त्या वेळी त्यांनी मोबाईल दूरच ठेवायचा, याची आठवण करून दिली. आव्हान सोपे नसणार याची जाणीव होती, त्यास सामोरे जायला तयार होते. शेजारच्या कोर्टवर इंडोनेशिया खेळाडूंची मॅच असल्याने प्रेक्षक जास्तच जोशात होते. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे अवघड जात होते.
- साईना नेहवाल

खेळावर पूर्ण समाधानी नाही, पण उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे नक्कीच खूष आहे. अर्थात, येथे थांबण्यास तयार नाही. कामगिरी यापेक्षा नक्कीच चांगली असेल, असा विश्‍वास आहे. कदाचित सुवर्णपदकही जिंकेन.
- पी. व्ही. सिंधू

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports


​ ​

संबंधित बातम्या