वृद्धिमान साहा ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकणार?

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

भारताचा कसोटी संघाचा मुख्य यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

बंगळूर : भारताचा कसोटी संघाचा मुख्य यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याला दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

गेल्या महिन्यात खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी आणखी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यानेच स्पष्ट केले. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबरमध्ये नियोजित आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला त्याला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सहा डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. साहाच्या खांद्याला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. मागील महिन्यात इंग्लंडमध्ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला इंग्लंडदौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. सध्या तो बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला, ''डॉक्टरांच्या मते पूर्णपणे तंदुरुस्त होणे हे प्रत्येकाच्या शारिरिक क्षमतेवर अवलंवून असते. मी दोन दिवसांपूर्वीच येथे उपचाराला सुरुवात केली आहे. शंभरटक्के तंदुरुस्त होण्यास किती कालावधी लागेल हे आताच सांगणे शक्य नाही मात्र यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मी सध्या मैदानावर खेळण्याचा विचार करत नाही फक्त दैनंदिन गरजेपुरती कामे करता येणे सध्या महत्त्वाचे आहे.''

''चार महिन्यांनंतर माधे संघात काय स्थान असेल याबद्दल मी सध्या काहीच विचार करत नाही. त्याविषयी कोणाशी बोलतही नाही. दुखापतीतून सावरल्यावर स्थानिक क्रिक्टमध्ये चांगली कामगिरी करण्यावर माझे लक्ष असेल,'' असेही त्याने स्पष्ट केले.   
 


​ ​

संबंधित बातम्या