...अन्‌ आयसीसीच्या ट्‌विटवर सचिनचे चाहते भडकले!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरही न जिंकता त्यांना विजेतेपद बहाल करण्यात आले होते.

मुंबई : अविस्मरणीय शतकी खेळी करून इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाच्या खाईतून अफलातून विजय मिळवून देणारा बेन स्टोक्‍स आयसीसीला अचानाकपणे श्रेष्ठ फलंदाज दिसू लागला आहे. स्टोक्‍सचे सचिन तेंडुलकरबरोबरचे छायाचित्र पोस्ट करून सर्वकालीन श्रेष्ठ असा उल्लेख आयसीसीने केला सचिनला कमी लेखल्याबद्दल त्याचे चाहते भडकले आणि समाज माध्यमावर आयसीसीला धारेवर धरले. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरही न जिंकता त्यांना विजेतेपद बहाल करण्यात आले होते. त्या सामन्यात सर्वोत्तम ठरलेल्या बेन स्टोक्‍सला सचिनकडून पारितोषिक देण्यात आले होते. ते छायाचित्र आपल्या अधिकृत ट्‌विटवर पुन्हा एकदा पोस्ट करून आयसीसीने सर्वकालीन श्रेष्ठ क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकर असा उल्लेख केला आहे. 

शतके मोजूया का? 
आयसीसीच्या या ट्‌विटवर सचिनच्या चाहत्यांनी ट्‌विटवरच आयसीसीवर हल्ला केला आहे. 15,921 कसोटी धावा, 18426 एकदिवसीय क्रिकेटमधील धावा. अनुक्रमे 54 आणि 45 ची सरासरी तर दुसऱ्याच्या 3469 कसोटी धावा आणि 2626 एकदिवसीय धावा त्यातील 35 आणि 40 ची सरासरी...आता आपण शतकांबाबत बोलूया का? असे उत्तर एका चाहत्याने दिले आहे. 

तुम्ही जे सांगाल त्यावर आम्ही विश्‍वास ठेवणार नाही. सर्वकालीन श्रेष्ठ खेळाडू सचिनच आहे. क्रिकेट विश्‍वात इतर सर्वोत्तम खेळाडू सचिननंतर सुरु होता, तुम्हाला समजतेय ना! असे ट्विट दुसऱ्या चाहत्याने केले आहे. 

तिसरा चाहता म्हणतो...बीसीसीआय कडक कारवाई करा आणि अशा प्रकारे बिनकामी ट्विट करणाऱ्या आयसीसीला बहिष्कृत करा. 

सध्या इंग्लिश क्रिकेट वर्तुळात बेन स्टोक्‍सचा उदोउदो सुरु आहे. ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची 9 बाद 286 अशी अवस्था झाली होती. पण 135 धावा करणाऱ्या बेन स्टोक्‍सने अखेरच्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. या विजयामुळे इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.


​ ​

संबंधित बातम्या