सचिनने शेअर केला कोर्टवरील फटकेबाजीचा व्हिडिओ, फेडररकडे मागितली टिप्स

टीम ई-सकाळ
Saturday, 4 July 2020

नुकताच सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो टेनिसच्या कोर्टवर फटकेबाजी करताना दिसतोय.

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय विक्रमांची नोद करणाऱ्या शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर टेनिसचा मोठा चाहता आहे. क्रिकेटचा विक्रमादित्य टेनिसच्या कोर्टवर दमदार कामगिरी करणाऱ्या रॉजर फेडररला पसंत करतो, हे देखील सर्वांना चांगलेच माहित आहे. इंग्लंड आणि फ्रान्सला जाऊन टेनिस कोर्टवरील थरारक सामने पाहत सचिनने अनेकदा आपले टेनिस प्रेम दाखवून दिले आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या विम्बल्डनमधील सामने पाहणे सचिन शक्यतो चुकवत नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धाही रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. कोरोनातून सावरत जगभरातील खेळाची मैदाने पुन्हा बहरण्याचे संकेत दिसत असताना सचिनने एक व्हिडिओ शेअर करत आपले टेनिस बद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नीने केलं पतीच्या जागी यष्टीरक्षण

नुकताच सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो टेनिसच्या कोर्टवर फटकेबाजी करताना दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करताना फोरहॅण्डचा फटका योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थितीत करत यात काय सुधारणा कराव्या लागतील, अशी विचारणा सचिनने चक्क टेनिस स्टार रॉजर फेडररला केलीय. फेडरर त्याला काय रिप्लाय देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सचिनच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. काही नेटकऱ्यांनी रॉजर फेडर फोरहॅण्ड फटका लगावतानाचे व्हिडिओ देखील शेअर केल्याचे पाहायला मिळते.   

विराटलाही लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता 

सचिन आणि फेडरर यांच्यात चांगली मैत्री आहे. यापूर्वी फेडररने क्रिकेटसंदर्भात सचिन तेंडुलकरकडून सल्ला घेतल्याचे पाहायला मिळाले होते. दोघे आपापल्या क्षेत्रातील आघाडीचे खेळाडू आहेत. रॉजर फेडररला टेनिसमधील सचिन असेही म्हटले जाते. कोर्टवर उतरल्यानंतर त्याच्यातील खिलाडूवृत्ती आणि शांत स्वभाव हा अगदी सचिनप्रमाणे असतो. प्रतिस्पर्ध्यावर शाब्दिक चकमक करण्यापेक्षा आपल्या कामगिरीने उत्तर देणे ही फेडररची खासियत आहे. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूमुळे खेळ जगतामध्ये शांतता पसरली आहे. हळूहळू खेळ पूर्ववद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एटीपीने फ्रान्स आणि अमेरिकन ओपनचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. पण यंदाच्या वर्षात फेडरर कोर्टवर दिसणार नसल्याचे त्याने यापूर्वीच जाहीर केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या