आचरेकरच सरच नाहीत तर हे सुद्धा आहेत सचिनचे गुरू...

टीम ई-सकाळ
Sunday, 5 July 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका खास व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गुरुप्रती मनातील भावना व्यक्त केल्या.

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या गुरुबद्दल आदराची भावना असते. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज सामान्यापासून ते लोकप्रियेतेच्या शिखरावर असलेला प्रत्येकजण आयुष्याला दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाबद्दल व्यक्त होताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात दोन दशकाहून अधिककाळ अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटर्संनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका खास व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गुरुप्रती मनातील भावना व्यक्त केल्या. सचिन तेंडुलकरचे गुरु कोण? असा प्रश्न विचारला तर दिवंगत रमाकांत आचरेकर सर.. हे नाव माहित नाही, असा क्रिकेट चाहता भेटणार नाही. आचरेकर सरासह सचिनच्या आयुष्याला आकार देण्यासाठी आणखी दोन व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने वडील आणि मोठा भाऊ मला गुरुतुल्य असल्याचे सांगत सचिनने त्यांचे आभार मानले आहेत. 

यासंदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यान म्हटलंय की, ज्या तीन लोकांमुळे एक विशिष्ट उंची गाठता आली त्या माझ्या गुरुवर्यांप्रती गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. मी जेव्हा बॅट हातात घेतो तेव्हा मला तीन लोक आठवतात. माझ्या यशात या तिघांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. सर्वात अगोदर सचिनने आपल्या मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांचा उल्लेख करत म्हटलंय की, भावानेच मला आचरेकर सराकडे नेण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा फलंदाजी करायचो त्यावेळी शारिरिक रुपाने तो माझ्याजवळ नव्हता पण मानसिक रुपात तो नेहमी माझ्यासोबतच असायचा.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आचरेकर सरांविषयी बोलताना काय बोलू... त्यांनी माझ्या फलंदाजीसाठी खूप मेहनत घेतली. सरावावेळी होणाऱ्या चुका ते नोट करुन ठेवायचे. त्यावर आमची तासनतास चर्चा व्हायची. माझ्या चुका सुधारण्यासाठी ते मला मार्गदर्शन करायचे, असे म्हणत त्याने दिवंगत रमाकांत आचरेकर सरांसोबतच्या आठवणीला उजाळा दिला. सर्वात शेवटी सचिनने दिवंगत वडील रमेश तेंडुलकर यांचे नाव घेतले. ध्येयाशी कधीच तडजोड करू नको, अशी शिकवण वडिलांनी मला दिली. माझ्यासाठी हा सल्ला खूप मोलाचा ठरला, असेही सचिनने सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या