#ThisDayThatYear मास्टर ब्लास्टरचे पहिले शतक

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

सचिनने आजच्याच दिवशी 1990मध्ये त्याच्या 100 शतकांमधले पहिले शतक ठोकले होते. या घटनेला आज 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

नवी दिल्ली : भारतरत्न सचिन तेंडुलकरने आजवर क्रिकेटविश्वाला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतक, शतकांचे शतक, क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम आजवर सचिनने आपल्या नावावर केले आहेत. सचिनने आजच्याच दिवशी 1990मध्ये त्याच्या 100 शतकांमधले पहिले शतक ठोकले होते. या घटनेला आज 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

मॅंचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सचिन फक्त 17 वर्षे आणि 112 दिवसांचा होता. या सामन्यात त्याने नाबाद 119 धावांची खेळी केली होती. येथूनच सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास सुरु झाला होता. 

प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ग्रॅहम गूच, माईक आर्थटन आणि रॉबिन स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर 519 धावांचे आव्हान उभे केले होते. भारताची फलंदाजी सुरु झाल्यावर सलामीवीर रवी शास्त्री आणि नवज्योत सिंग सिद्धू हे अवघ्या 48 धावांवर बाद झाले. त्यानतंर मोहम्मद अझरूद्दीन आणि संजय मांजरेकर यांच्या खेळीने भारताने पहिल्या डावात 432 धावांपर्यंत मजल मारली. 

इंग्लंडने दुस-या डावात 4 बाद 340 धावांवर डाव घोषित केला. भारतासमोर विजयासाठी 408 धावांचे असताना दुस-या डावातही भारतीय फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. भारत सहा बाद 183 अशा बिकट परिस्थितीत असताना सचिनने सामन्याची धुरा खांद्यावर घेतली. त्याने (नाबाद 119) मनोज प्रभाकरसह (नाबाद 67) सातव्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने हा सामना अनिर्णीत राखला.

सचिनचे हे कारकिर्दीतले पहिले कसोटी शतक ठरले. त्यानंतर सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत.


​ ​

संबंधित बातम्या