रशियाला जागतिक स्पर्धा दूरच

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

-डोपिंग प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रशियन ऍथलेटिक्‍स महासंघावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या परिषदेने घेतला आहे

- जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरलेले रशियाचे धावपटू स्वतंत्रपणेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या ध्वजाखाली सहभाग घेतील.

-डोपिंगविरोधी कार्यासाठी रशियाने उचलेले पाऊल पुरेसे आहे, असे म्हणता येणार नाही

-रशियाने सादर केलेल्या उत्तरामुळे वाडाचे समाधान झाले नाही, तर रशियाला पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात येईल

दोहा - डोपिंग प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रशियन ऍथलेटिक्‍स महासंघावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या परिषदेने घेतला आहे. त्यामुळे जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरलेले रशियाचे धावपटू स्वतंत्रपणेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या ध्वजाखाली सहभाग घेतील. रशियाच्या ध्वजाखाली त्यांना भाग घेता येणार नाही. त्याचप्रमाणे सुवर्णपदक जिंकल्यास रशियाचे राष्ट्रगीतही वाजविले जाणार नाही. 
रशियात शिस्तबद्ध डोपिंग होत आहे, असा अहवाल जागतिक उत्तेजक विरोधी संस्था (वाडा) ने दिला होता. त्या आधारावर नोव्हेंबर 2015 मध्ये रशियन ऍथलेटिक्‍स महासंघावर चार वर्षांची बंदी टाकण्यात आली होती. या डोपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने रुन अँडरसन यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्ती केली होती. या टास्क फोर्सने दिलेल्या अहवालाच्या आधारावरच ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. अँडरसन यांनी कौन्सिलमध्ये दिलेल्या माहितीनुसार बंदी असलेले प्रशिक्षक ऍथलिट्‌ससोबत कार्य करीत आहे. त्यामुळे रशियन ऍथलेटिक्‍स महासंघाच्या डोपिंग विरोधी प्रयत्नांवर शंका उपस्थित झाली आहे. डोपिंगविरोधी कार्यासाठी रशियाने उचलेले पाऊल पुरेसे आहे, असे म्हणता येणार नाही, हे सुद्धा एक कारण आहे, असे अँडरसन म्हणाले. 
डोपिंग स्कॅंडल प्रकरणी मॉस्को प्रयोगशाळेतून देण्यात आलेल्या माहिती, सॅंपलची (डाटा) चौकशी सुरू असून या माहिती, सॅंपलसोबत छेडछाड करण्यात आली आहे का, याविषयी ऍथलेटिक्‍स इंटेग्रिटी युनिट निश्‍चित माहिती देऊ शकले नाही. माहिती आणि सॅंपलसोबत छेडछाड करण्यात आल्याची शंका इंटेग्रिटी युनिटला आहे, ही बाबही बंदी कायम ठेवताना विचारात घेण्यात आली, अशी माहिती अँडरसन यांनी दिली. 

टोकियोतील प्रवेश धोक्‍यात? 
रशिया उत्तेजक विरोधी संस्थेने वाडाला जी माहिती, सॅंपल आणि वैद्यकीय अहवाल दिले त्यात सातत्य नाही किंवा एकसूत्रपणा नाही. त्यामुळे टोकियो येथे झालेल्या वाडाच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रशिया उत्तेजक विरोधी संस्थेची चौकशी सुरू आहे. त्यांना यावर आपले मत मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मॉस्को प्रयोगशाळेत असलेल्या डोप टेस्टपैकी काही प्रमुख पॉझिटिव्ह टेस्ट गायब करण्यात आला, हा प्रमुख आरोप आहे. या आरोपात तथ्य आढळले आणि रशियाने सादर केलेल्या उत्तरामुळे वाडाचे समाधान झाले नाही, तर रशियाला पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यापासून मज्जाव करण्यात येईल आणि ही बंदी 2022 च्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेपर्यंत कायम राहू शकते. 
 


​ ​

संबंधित बातम्या