चॅलेंजर्सची सुपरकिंग्जवर मात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 February 2019

कोल्हापूर - रोटरी प्रीमिअर लीग-‘आरपीएल’ क्रिकेट स्पर्धेत शनिवारी प्रोफेशनल चॅलेंजर्सने एमडब्लूसी सुपरकिंग्जवर अखेरच्या षटकांत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या षटकात टिच्चून गोलंदाजी करत मॅक्‍सन ब्लास्टर्सने मार्व्हलस सुपर रेंजर्सला आठ धावांनी पराभूत केले

कोल्हापूर - रोटरी प्रीमिअर लीग-‘आरपीएल’ क्रिकेट स्पर्धेत शनिवारी प्रोफेशनल चॅलेंजर्सने एमडब्लूसी सुपरकिंग्जवर अखेरच्या षटकांत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या षटकात टिच्चून गोलंदाजी करत मॅक्‍सन ब्लास्टर्सने मार्व्हलस सुपर रेंजर्सला आठ धावांनी पराभूत केले. रोटरी क्‍लब ऑफ शिरोली एमआयडीसी वॉरियर्सच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत निव स्पेक्‍ट्रम ब्लास्टर्सवर नऊ गडी राखून विजय मिळविला. पास्ट रोटरॅक्‍टर्स युनायटेडने चाटे चॅम्प्सवर ४५ धावांनी मात केली.  

सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी प्रीमिअर लीग-‘आरपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ऋतुराज पाटील फाउंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत; तर ॲपल कॅन्सर सेंटर सहप्रायोजक आहेत. हॉटेल पर्ल हॉस्पिटॅलिटी पार्टनर असून, रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, तर हेरंब शेळके कॅप्स पार्टनर आहेत. रोटेरियनमधील मैत्रिपूर्ण संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने सलग पाचव्या वर्षी स्पर्धा होत आहे. मेरी वेदर मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

एमडब्लूजी सुपरकिंग्जने १० षटकांत तीन गडी गमावून १०३ धावा केल्या. संग्राम सरनोबतने २५ चेंडूंत ४३ धावा केल्या. त्यात चार षटकार व तीन चौकारांचा समावेश होता. सईद पटेलने २० चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले. संजय पाटीलने नाबाद १०, सचिन पाटील पाच व संजय साळोखेने नाबाद चार धावा केल्या. प्रोफेशनल चॅलेंजर्सकडून पंकज तेलीने तीन गडी बाद केले. 

प्रत्युत्तरादाखल प्रोफेशनल चॅलेंजर्सने १० षटकांत आठ गडी गमावून १०७ धावा केल्या. कर्णधार सचिन परांजपे १४ व गणेश मोरजकर तीन धावांवर बाद झाल्यानंतर पंकज तेली शून्य, सरगम फलारे सात, सूरज रायगांधी पाच धावांवर बाद झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शंतनू लिमयेने ११ चेंडूंत २५ व जयजित परितकरने ७ चेंडूंत १७ धावा फटकावून सामन्यात रंगत आणली. संतोष साखरेने नऊ व राजेंद्र बाडने १० धावा करत सामना जिंकला. एमडब्लूजी सुपरकिंग्जकडून संग्राम सरनोबत, संजय साळोखे व सुधीर नाईक यांनी प्रत्येकी दोन, तर सईद पटेल व सचिन पाटीलने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

मॅक्‍सन ब्लास्टर्सने १० षटकांत ७८ धावांचे आव्हान मार्व्हलस सुपर रेंजर्ससमोर ठेवले. त्यांचे दहा गडी बाद झाले. सलामीचा फलंदाज युवराज जाधवने १३ व मंदार चव्हाणने ११ धावा केल्या. नितीन शिंदे दोन, रवी पावरा नऊ व महादेव नरकेने सहा धावा केल्या. दाजीबा पाटीलने २० धावा करत संघाचा डाव सावरला. पण, त्यानंतर जावेद महात तीन, धर्मेंद्र दोन, स्वप्नील कांबळे व मौनंग पटेल शून्य धावेवर तंबूत परतले.

राजेश आंबेकरने नाबाद एक धाव केली. मार्व्हलस सुपर रेंजर्सकडून रविराज शिंदेने चार, सचिन गाडगीळ व देवदत्त फडकेने प्रत्येकी दोन, तर नामदेव गुरवने एक गडी बाद केला. मार्व्हलस सुपर रेंजर्सने शेवटच्या षटकापर्यंत मॅक्‍सन ब्लास्टर्सला झुंजवले. त्यांचा डाव १० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ७० धावांवर आटोपला. अखेरच्या षटकात नामदेव गुरवने वादळी खेळी केली असली, तरी त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याने १६ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या. तत्पूर्वी रविराज शिंदे सात, राजेश रेड्डीज शून्य, अजित मडके १५, सचिन गाडगीळ एक, देवदत्त फडके १२ धावांवर बाद झाले. प्रवीण काजवे, आर. वाय. पाटील यांना फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. मॅक्‍सन ब्लास्टर्सकडून महादेव नरकेने दोन, मंदार चव्हाण व दाजीबा पाटीलने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

निव स्पेक्‍ट्रम स्टार्सने १० षटकांत सात गडी गमावून ७० धावा केल्या. संजय कदमने शून्य व मंजूनाथ सवन्नावरने पाच धावा केल्या. शैलेश भोसलेने १५, रविराज मायदेव १२, रोहन सावंत ११, विद्यानंद बेडेकर १०, राजेश आडके तीन, तर सत्यजित पाटीलने नऊ धावा केल्या. रोटरी क्‍लब ऑफ शिरोली एमआयडीसी वॉरियर्सकडून गोरक्ष ऐवाळे व समीर कोतवालने प्रत्येकी दोन, तर अजित जाधव, अनिकेत पाटील व धीरज पाटीलने प्रत्येकी एक गडी बाद केला.

उत्तरादाखल शिरोली एमआयडीसी वॉरियर्सचे फलंदाज निव स्पेक्‍ट्रम स्टार्सच्या गोलंदाजांवर तुटून पडले. शिरोली एमआयडीसीने ६.५ षटकांत एक गडी गमावून ७३ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या अजित जाधवने १६ चेंडूंत २९ धावा केल्या. त्यात एक षटकार व तीन चौकार ठोकले. अनिकेत पाटीलने तुफान फलंदाजी करत २३ चेंडूंत ३६ धावा फटकाविल्या. त्याने पाच चौकार ठोकले. गोरक्ष ऐवाळेने नाबाद दोन धावा केल्या. निव स्पेक्‍ट्रमकडून मंजुनाथ सवन्नावरने एक गडी बाद केला. 

पास्ट रोटरॅक्‍टर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत तीन गडी गमावून १०८ धावा केल्या. त्यांच्या सचिन देशमुखने ३१ चेंडूंत ५० धावा फटकाविल्या. त्याने दोन षट्‌कार व पाच चौकार ठोकले. राजू करूरने १९, तर गोपाळ गवसने नाबाद ३१ धावा केल्या. गोपाळने एक षट्‌कार व पाच चौकार फटकावले. प्रत्युत्तरादाखल चाटे चॅम्प्सला १० षटकांत चार गडी गमावून ६३ धावा करता आल्या. 

त्यांच्या निवास वाघमारेने १२, श्रीकांत झेंडेने २२ धावा केल्या. प्रीतेश कर्नावटने नाबाद २०, तर डॉ. नचिकेत दोन, सागर महामुनीने एक धाव केली. पास्ट रोटरॅक्‍टर्सकडून प्रमोद देसाई, नीलेश मुळे व गोपाळ गवसने प्रत्येकी एक गडी बाद केला.


​ ​

संबंधित बातम्या