अव्वल स्थान नव्हे जेतेपदांचा पाठलाग : फेडरर 

वृत्तसंस्था
Saturday, 9 February 2019

जिंकण्याची संधीच उरलेली नाही असे तुम्हाला वाटू लागताच ती समस्या ठरते. माझे क्रमवारीतील स्थान आणखी घसरले तरी ती समस्या नसेल. दोन वर्षांपूर्वी मी 17व्या क्रमांकावर असूनही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकलो. तसे जोपर्यंत मला वाटते आहे तोपर्यंत सारे काही सुरळीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलो आणि ग्रॅंड स्लॅम किंवा इतर स्पर्धा जिंकू शकलो नाही, तर त्यापेक्षा मी 17वा असणे पसंत करेन. 
- रॉजर फेडरर

जीनिव्हा : "वयाच्या 37व्या वर्षी आता अव्वल क्रमांक मिळविणे हे काही माझ्यासाठी प्राधान्य उरलेले नाही. तंदुरुस्त राहून जेतेपदांचा पाठलाग करणे हीच माझ्या सहभागाची कल्पना आहे,' अशी भूमिका स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर याने व्यक्त केली. 

फेडररला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रीसच्या प्रतिभासंपन्न स्टीफानोस त्सित्सिपास याने हरविले. त्यामुळे जागतिक क्रमवारीत त्याची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. कारकिर्दीत 20 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेला फेडरर गेल्याच वर्षी सर्वाधिक वयाचा अव्वल टेनिसपटू बनला. गेल्या वर्षी त्याने सहावे ऑस्ट्रेलियन जेतेपद मिळविले. त्यानंतर काही आठवड्यांनी त्याने हा पराक्रम केला. त्याने लागोपाठ दोन वेळा (2017, 2018) ही स्पर्धा जिंकून टेनिसप्रेमी आणि तज्ञांना थक्क केले. 

आता आपला प्राधान्यक्रम बदलल्याचे फेडररने स्पष्ट केले. अव्वल क्रमांकासाठी नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल यांचा प्रतिस्पर्धी बनण्यास तो प्राधान्य देऊ इच्छित नाही. तो म्हणाला की, "तंदुरुस्त राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी स्पर्धा जिंकू शकतो असा विश्‍वास वाटतो. मी जोकोविच व नदाल यांना हरवू शकतो याची कल्पना आहे. त्यात यश मिळाल्यास आनंदच लाभतो.' 

फेडरर यानंतर दुबई, इंडियन वेल्स, मायामी या स्पर्धांत खेळेल. त्यानंतर फ्रेंच ओपनपूर्वी कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा हे ठरवेल. सध्या फेडरर बॅसलमध्ये आला आहे. मायदेशात काही आठवड्यांसाठी परतल्यामुळे, मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या सहवासात राहणे व सराव करणे आनंददायक असल्याचे तो म्हणाला. 

जिंकण्याची संधीच उरलेली नाही असे तुम्हाला वाटू लागताच ती समस्या ठरते. माझे क्रमवारीतील स्थान आणखी घसरले तरी ती समस्या नसेल. दोन वर्षांपूर्वी मी 17व्या क्रमांकावर असूनही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकलो. तसे जोपर्यंत मला वाटते आहे तोपर्यंत सारे काही सुरळीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलो आणि ग्रॅंड स्लॅम किंवा इतर स्पर्धा जिंकू शकलो नाही, तर त्यापेक्षा मी 17वा असणे पसंत करेन. 
- रॉजर फेडरर

संबंधित बातम्या