बेबीज् डे आउट मस्त झाला : रिषभ पंत

सुनंदन लेले
Saturday, 25 August 2018

दिनेश कार्तिकच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याचा फॉर्मही थोडा हरवल्याने रिषभ पंतला अचानक कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. रिषभने चांगले झेल पकडून आणि पहिल्या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून छाप पाडली. ‘मर्यादित षटकांचा मर्यादित खेळाडू’ शिक्का रिषभने कष्टाने पुसला.

लंडन : दिनेश कार्तिकच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याचा फॉर्मही थोडा हरवल्याने रिषभ पंतला अचानक कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. रिषभने चांगले झेल पकडून आणि पहिल्या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून छाप पाडली. ‘मर्यादित षटकांचा मर्यादित खेळाडू’ शिक्का रिषभने कष्टाने पुसला.

‘‘भारतीय ‘अ’ संघासोबत बरेच सामने खेळल्याने आणि नुकताच मी इंग्लंड दौराही ‘अ’ संघासोबत केल्याने मोठा फायदा झाला. फलंदाजीपेक्षा यष्टीरक्षण करताना इंग्लंडमध्ये जास्त आव्हाने उभी राहतात. इथे चेंडू स्टंप मागेही स्वींग होत राहतो ज्याने विकेट किपरला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवायची सवय अंगात बाळगावी लागते. अगदी नजीकच्या भूतकाळात मी इंग्लंडमध्ये खेळत होतो ज्याचा खूप मोठा आधार मला कसोटी पदार्पण करताना मिळाला’’, रिषभ पंतने सांगितले. 

प्रथम श्रेणीचे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधल्या फरकाबद्दल विचारले असता रिषभ म्हणाला, ‘‘चांगलाच फरक जाणवतो. कसोटी सामना खेळताना अगदी एक क्षणही गाफील राहून चालत नाही. तुमच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा कसोटी सामन्यात बघितली जाते. मला संघातील वरिष्ठ खेळाडूंनी खूप विश्वास दिला मार्गदर्शन केले. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना पहिली चूक ही शेवटची ठरते हे लक्षात आल्यावर दडपण वाढते’’.

पहिल्या कसोटीबद्दल विचारले असता रिषभ पंत हसत हसत म्हणाला, ‘‘माझे गुरू तारक सिन्हा सरांनी मला केलेल्या मार्गदर्शनामुळे हा दिवस मी बघू शकलो. पदार्पणाच्या कसोटीत खेळ खूप चांगला नाही पण समाधानकारक करून शकलो. कसोटी क्रिकेटमधल्या पहिल्या धावा मी षटकार मारून केल्या हा केवळ योगायोग होता. मी ठरवून काही केले नाही. फिरकी गोलंदाज टाकत होता आणि चेंडू माझ्या पट्ट्यात आला म्हणून मी सरळ मारला इतकेच. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. त्या अर्थाने बेबीज् डे आउट मस्त झाला. मला यानंतर समाधानी व्हायचे नाही. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. वाट खडतर आहे याचीही मला कल्पना आहे पण मेहनत करून आणि चित्त एकाग्र ठेवून मी पुढे जायचा प्रयत्न करेन’’, पंत म्हणाला.

मुख्य यष्टीरक्षक वृद्धीमान सहा आणि दुसरा पर्याय दिनेश कार्तिकला दुखापत झाल्याने संधी मिळालेल्या रिषभ पंतने भारतीय संघाकरता अजून एक चांगला पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे.


​ ​

संबंधित बातम्या