रिषभचा विषय सोडा त्याला मोकळेपणाने खेळू द्या - रोहित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

- यष्टिरक्षक रिषभ पंतबाबत चर्चा न करता त्याला मोकळेपणाने खेळू द्या असे रोहित म्हणाला 

- भूतकाळातील कामगिरीवर कधीच विश्‍वास करीत नाही. मैदानावर चांगली कामगिरी, हाच विजयाचा मूलमंत्र आहे

नागपूर - नागपुरात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली असली, तरी क्रिकेटमध्ये भूतकाळातील रेकॉर्ड कधीच महत्त्वाचा ठरत नसतो. प्रत्येक सामना नवीन असून, विजयासाठी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल, असे सांगून कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयाबद्दल विश्‍वास व्यक्‍त केला. त्याचवेळी त्याने यष्टिरक्षक रिषभ पंतबाबत चर्चा न करता त्याला मोकळेपणाने खेळू द्या असे सांगत त्याची पाठराखणही केली. 
बांगलादेशविरुद्ध रविवारी होणाऱ्या निर्णायक टी-20 सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, ""मी भूतकाळातील कामगिरीवर कधीच विश्‍वास करीत नाही. मैदानावर चांगली कामगिरी, हाच विजयाचा मूलमंत्र आहे. बैठकीत याच एका गोष्टीवर आमची चर्चा होत असते, त्यामुळे विजयासाठी सर्वांनाच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात केलेली कामगिरी लक्षात घेता, आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. सामन्यात काहीही घडू शकते.'' 

बिनधास्त खेळ
संघातील युवा खेळाडूंना विशेषतः रिषभ पंतला क्रिकेट "एन्जॉय' करण्याचा, तसेच बिनधास्त खेळण्याचा सल्ला रोहितने या वेळी दिला. रोहित म्हणाला, ""संघातील बहुतांश खेळाडू अननुभवी असून, आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कमी अनुभव आहे. जसजसा अनुभव येईल, तसतशी त्याची कामगिरी सुधारेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने फार मोठे आव्हान असते. त्यात सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीची आवश्‍यकता असते, त्यामुळे प्रत्येकाला कौशल्याचा योग्य वापर करून संघातील आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल. संयम आणि "वेट ऍण्ड वॉच'चे धोरण अवलंबून सर्वांनी क्रिकेटवरच आपले सर्व लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.  
भारतीय संघातील प्रत्येकाकडे कोणत्याही संघाविरुद्ध आव्हान यशस्वीरीत्या पेलण्याची क्षमता आहे, त्यामुळे माझेही काम बरेच हलके होते. राजकोटमध्ये शतक हुकल्याचे मला दुःख नाही. माझ्या कामगिरीमुळे भारतीय संघ सामना जिंकू शकला, त्याचे अधिक समाधान आहे, असेही रोहित म्हणाला. 
------------- 

मालिकेतील संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. मात्र, मालिका जिंकायची असेल, तर आम्हाला कामगिरीचा आलेख उंचवावा लागेल. एक- दोन फलंदाजांना मोठी खेळी करावीच लागेल. येथे फिरकी गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरू शकते. 
- रसेल डॉमिंगो, बांगलादेश प्रशिक्षक 


​ ​

संबंधित बातम्या