सात क्रमांकाची जर्सीही निवृत्त करा, दिनेश कार्तिकची मागणी बीसीसीआय मान्य करणार? 

शैलेश नागवेकर
Sunday, 16 August 2020

भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्‍वात आपल्या कर्तूत्वाचा बहुमोल ठसा उमटवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट भावनावश झाले आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्‍वात आपल्या कर्तूत्वाचा बहुमोल ठसा उमटवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट भावनावश झाले आहे. वाढदिवसाची सात तारीख आणि तोच क्रमांक धोनीची मोठी ओळख होती. आता हा क्रमांकही रिटायर्ड करा अशी मागणी धोनीचा साथीदार दिनेश कार्तिकने केली आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (10 क्रमांकाची जर्सी), फुटबॉलमध्ये दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी (10) ख्रिस्तियानो रोनाल्डो (7) यांनी त्यांच्या या क्रमांकाची जर्सी अजरामर केली आहे. तसेच धोनी आणि सात क्रमांकाची जर्सी हे समिकरण झालेले आहे. हाच मुद्दा पकडून कार्तिकने धोनीची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची मागणी करताना धोनीबरोबरचा विश्‍वकरंडक उपांत्य सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. 

वास्तविक 2004 मध्ये धोनीच्या तीन महिने अगोदर कार्तिकने भारतीय संघात पदार्पण केले आहे. पण धोनी संघात येताच कार्तिकला अधूनमधून संधी मिळत होती तरिही कार्तिकला 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 32 ट्‌वेन्टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. कधी कधी धोनी आणि कार्तिक दोघेही यष्टीरक्षक असतानाही एकाच वेळी संघात खेळलेले आहेत. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

धोनीची जर्सी निवृत्त करण्याच्या कार्तिकच्या मागणीला बीसीसीआयच्या अपेक्‍स कॉन्सिलमधील सदस्या आणि माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी यांनीही पाठींबा दर्शवला. हा सन्मान धोनीला मिळायला हवा असे त्यांनी सांगितले. कधी आणि का? असे अनेक प्रश्‍नचिन्ह उभे केले जात असताना धोनीने योग्य वेळी निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघात खेळाडू आणि कर्णधारमधून धोनीचे अनन्यसाधरण आहे. त्याच्यासह आता त्याची जर्सीही निवृत्त करणे हा धोनीचा बहुमान ठरेल, असे रंगास्वामी म्हणाल्या. 

मितालीचाही पाठींबा 
भारतीय महिला संघाची आणखी एक कर्णधार मिताली राजनेही धोनीच्या जर्सीचा सन्मान राखला पाहिले असे आग्रही मत व्यक्त केले. कॅप्टून कूल, कमालीचा तल्लख मेंदू अशी ओळख असलेल्या धोनीचे योगदान अफलातून आहे. दोन विश्‍वकरंडक जिंकून देण्याचे करोडो भारतीयांचे स्वप्न धोनीने पूर्ण केले. त्याच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा...असा संदेश मितालीने दिला आहे. 

नियम काय म्हणतो 
बीसीसीआय असो आयसीसी असो जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा असा कोणताही नियम नाही. धोनीची जर्सी निवृत्त केली तर आमची काहीच हरकत नसेल हा प्रत्येक संघटनांचा निर्णय आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर त्याची 10 क्रमांकाचीही जर्सी 2017 मध्ये निवृत्त झाली होती. पण मुंबईचाच खेळाडू शार्दुर ठाकूरने श्रीलंका दौऱ्यातील आपल्या पदार्पणाच्या समन्यात 10 क्रमांकाची जर्सी वापरली त्यावेळी सोशल मिडियातून त्याच्यावर जबरस्त टीका करण्यात आली. अखेर त्याने जर्सी क्रमांक बदलला.


​ ​

संबंधित बातम्या