भारतीय फुटबॉलपटूंवरही दिल्लीच्या धुरक्‍याची 'चाल'

वृत्तसंस्था
Tuesday, 13 November 2018

भारतीय संघाचे डॉक्‍टर, तसेच फिजिओ दिवसाच्या पहिल्या सत्रापूर्वी प्रत्येक खेळाडूची तपासणी करतात. त्यात स्नायूंची कमजोरी, दुखापती, डिहायड्रेशन प्रामुख्याने बघितले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक पेय पदार्थ घेण्याची सूचना देण्यात आली आहे; मात्र अद्याप तरी खास आहार दिला जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : दिल्लीतील धुरक्‍यामुळे जागतिक महिला बॉक्‍सिंगची पूर्वतयारी करीत असलेले स्पर्धकच धास्तावलेले नाहीत, तर भारतीय फुटबॉल महासंघही चिंताग्रस्त आहे. ओमानविरुद्धच्या लढतीसाठी पूर्वतयारी करीत असलेल्या खेळाडूंची रोज सरावापूर्वी तपासणी होत आहे.

भारत आणि ओमान यांच्यात 17 नोव्हेंबरला लढत आहे. या लढतीसाठी भारतीय संघ गुरुवारी अम्मानला रवाना होईल. त्यापूर्वी संभाव्य खेळाडूंचे सराव शिबिर सोमवारपासून नवी दिल्लीत सुरू झाले. दिल्लीतील धुरक्‍याचा सर्वांनाच त्रास होत आहे. त्याचा खेळाडूंवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सरावापूर्वी सकाळी 9 वाजता सखोल तपासणी होत आहे.

भारतीय संघाचे डॉक्‍टर, तसेच फिजिओ दिवसाच्या पहिल्या सत्रापूर्वी प्रत्येक खेळाडूची तपासणी करतात. त्यात स्नायूंची कमजोरी, दुखापती, डिहायड्रेशन प्रामुख्याने बघितले जात आहे. खेळाडूंना अधिकाधिक पेय पदार्थ घेण्याची सूचना देण्यात आली आहे; मात्र अद्याप तरी खास आहार दिला जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिल्लीतील प्रदूषणाचा त्रास फुटबॉलपटूंनाही जाणवत आहे; मात्र त्याच्याशी खेळाडू जुळवून घेत आहेत. त्याशिवाय पर्यायच नाही, असेही ते सांगतात. अर्थातच खेळाडूंना फिजिओ आणि डॉक्‍टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. अद्याप तरी कोणाही खेळाडूला याचा त्रास झालेला नाही.

​ ​

संबंधित बातम्या