महंमद अनस धावणार फक्त रिले शर्यत

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

-चारशे मीटर शर्यतीत ष्ट्रीय विक्रम नोंदविल्यावरही जागितक मैदानी स्पर्धेत भारताचा महंमद अनस केवळ रिले शर्यतीत धावणार

-भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडून त्याची 400 मीटरसाठी प्रवेशिकाच नाही

-आंतरराष्ट्रीय महासंघाने गुरुवारी सहभागी स्पर्धकांची यादी जाहीर केल्यावर ही बाब निदर्शनास आली

कोची ः मैदानी स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविणारा धावपटू महंमद अनस जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतरही भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने त्याची प्रवेशिका केवळ 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीसाठी पाठविली आहे. 
ऍथलेटिक्‍स महासंघाच्या या निर्णयामुळे आता अनस पुढील आठवड्यात दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत 400 मीटरच्या शर्यतीत धावताना दिसणार नाही. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने गुरुवारी सहभागी धावपटूंची प्राथमिक यादी जाहीर केली तेव्हा ही बाब समोर आली. या यादीनुसार अनस केवळ 4 बाय 400 मीटरच्या पुरुष आणि मिश्र रिले शर्यतीत धावणार आहे. 
राष्ट्रीय विक्रमवीर असल्यामुळे अनसला जागतिक स्पर्धेतून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी 400 मीटर शर्यतीत पात्र ठरण्याची चांगली संधी होती. जागतिक स्पर्धेसाठी त्याने जुलै चेक प्रजासत्ताक येथील स्पर्धेसाठी 45.21 सेकंद अशी सरस वेळ देताना पात्रतेचा 45.30 सेकंदाचा निकष सहज पार केला होता. 
विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी पोटरीच्या दुखापतीतून नुकताच स्थिरावलेल्या ए. धरुन याची 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीबरोबर रिले शर्यतीसाठी प्रवेशिका पाठविण्यात आली आहे. धरून या स्पर्धा प्रकारात अजून आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ गाठू शकलेला नाही.


​ ​

संबंधित बातम्या