बार्सिलोना आणि रेयालची जेतेपदास गवसणी

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

बार्सिलोनाने सुरवातीच्या पिछाडीनंतर सेविलाचे कडवे आव्हान 2-1 असे परतवत स्पॅनिश सुपर कप फुटबॉलचे जेतेपद पटकावले. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळताना बार्सिलोनाने विजय मिळविला. मेस्सीने संघाच्या दोन्ही गोलसाठी मोलाच्या चाली रचित कर्णधारास साजेशी कामगिरी केली होती. 

माद्रिद / बार्सिलोना : बार्सिलोनाने सुरवातीच्या पिछाडीनंतर सेविलाचे कडवे आव्हान 2-1 असे परतवत स्पॅनिश सुपर कप फुटबॉलचे जेतेपद पटकावले. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळताना बार्सिलोनाने विजय मिळविला. मेस्सीने संघाच्या दोन्ही गोलसाठी मोलाच्या चाली रचित कर्णधारास साजेशी कामगिरी केली होती. 

बार्सिलोनाने एकंदर तेराव्यांदा आणि गेल्या नऊ मोसमांत सहाव्यांदा सुपर जिंकला. जगज्जेत्या फ्रान्स संघात असलेल्या औस्माने देम्बेले याच्या गोलमुळे बार्सिलोनाने बाजी मारली. पाब्लो साराबिया याने नवव्या मिनिटास प्रतिआक्रमणात गोल करीत सेविलास आघाडीवर नेले. लिओनेल मेस्सीच्या फ्री किकवर वेगाने चाल रचत गेरार्ड पिके याने बार्सिलोनास बरोबरी साधून दिली. 

खरंतर सेविलाने बार्सिलोनास विजयाची भेट दिली, असेही म्हणणे योग्य होईल. बार्सिलोना गोलरक्षक मार्क आंद्रे याने सेविलाचा युवा आक्रमक ऍलेक्‍सी विदाल याला खाली पाडले; मात्र बेन येद्देर याच्या पेनल्टी किकने बार्सिलोना गोलरक्षकाचा कसही पाहिला नाही. यामुळे बार्सिलोनाने गतमोसमातील ला लिगापाठोपाठ सुपर कप जिंकला. कोपा डेल रे स्पर्धेचे उपविजेते असल्यामुळे सेविला या लढतीस पात्र ठरले होते. 

सुपर कप लढतीतील युरोपाबाहेरील खेळाडूंवर कोणतीही मर्यादा नसेल, असे स्पेन महासंघाने जाहीर केल्यामुळे सेविलाने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. बार्सिलोनाने युरोपबाहेरील तिघांचीच निवड केल्यामुळे हा प्रश्न चिघळला नाही. अर्थात, लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेझ हे युरोपीय महासंघाचे नागरिक यापूर्वीच ठरवले गेल्यामुळे बार्सिलोनासमोर संघनिवडीचा प्रश्न आला नाही. 

रोनाल्डोच्या अनुपस्थितीत यश 
रेयाल माद्रिदने एसी मिलानला 3-1 असे हरवत सॅंतिएगो बर्नाबेऊ करंडक जिंकला. गॅरेथ बेल आणि करीम बेनझेमा यांनी गोल करीत रेयालचा विजय साकारला. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत रेयालचे आक्रमण कोलमडेल, ही अपेक्षा फोल ठरली. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत रेयाल आक्रमणाची धुरा बेलने प्रामुख्याने सांभाळली. मार्को ऍसेनसिओ, बेनझेमा आणि बेल या त्रयीने रेयालच्या आक्रमणाचा धडाका कमी होऊ दिला नाही.

संबंधित बातम्या