सिंधूचा रौप्य ते सुवर्ण प्रवास : सारं क्रेडिट गोपिचंद नाही तर प्रशिक्षक किम जी ह्यून यांचंही

रवींद्र मिराशी
Thursday, 29 August 2019

काही दिवस आधी सिंधूच्या नवीन प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या कोरियाच्या 'किम जी ह्यून' यांनी सिंधू बाबत केलेल्या अभ्यासपूर्ण टिप्पणी मोलाच्या वाटतात. या निमित्ताने त्याचा धांडोळा घेणे गरजेचे वाटते. सिंधूच्या जगज्जेतेपदा नंतर सुद्धा किम या प्रशिक्षक माध्यमांमध्ये  फारशा प्रकाशझोतात आलेल्या दिसल्या नाहीत. किंवा त्यांच्यावर प्रकाशझोत टाकला गेला नाही.   

नुकतेच भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जगज्जेतेपदाचा मान पटकावला. सिंधूला घडविण्यात गोपीचंद यांचा प्रशिक्षक म्हणून सिंहाचा वाटा आहे, हे सर्वश्रुत आहे. तसेच मोक्याच्या क्षणी सिंधूची रुपेरी कामगिरी होत होती, हे ही सर्वश्रुत होते. "हे सुवर्णपदक म्हणजे माझ्या गुणवत्तेवर शंका घेणाऱ्यांना, मी कामगिरीतून दिलेले उत्तर आहे" असे जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रतिक्रियेच्या माध्यमातून सिंधूने म्हटले आहे.

सिंधूने आपल्या भावनांना जरी अशा प्रतिक्रियेतून वाट करून दिलेली असली तरी खऱ्या चाहत्यांना सिंधू कडून सोनेरी कामगिरीचीच अपेक्षा होती. उलटपक्षी सिंधूच्या चाहत्यांना तिच्या गुणवत्तेबद्दल किंवा क्षमतेबाबत कोणती शंकाच नव्हती. गुणवत्ता आणि क्षमता असताना सोनेरी कामगिरी का होत नाही आहे? अशी शंका चाहत्यांना होती. याच संकेतस्थाळावर स्पर्धेपूर्वी काही दिवस आधी सिंधूच्या नवीन प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या कोरियाच्या 'किम जी ह्यून' यांनी सिंधू बाबत केलेल्या अभ्यासपूर्ण टिप्पणी मोलाच्या वाटतात. या निमित्ताने त्याचा धांडोळा घेणे गरजेचे वाटते. सिंधूच्या जगज्जेतेपदा नंतर सुद्धा किम या प्रशिक्षक माध्यमांमध्ये  फारशा प्रकाशझोतात आलेल्या दिसल्या नाहीत. किंवा त्यांच्यावर प्रकाशझोत टाकला गेला नाही.    

Korean coach Kim Ji Hyun with India's new world badminton women's singles gold medallist P.V. Sindhu.

5 फूट 7 इंच उंची असलेल्या 44 वर्षीय दक्षिण कोरियाच्या किम जी ह्यून यांनी बॅडमिंटन मध्ये आपली उज्वल कारकीर्द घडवली आहे. निवृत्ती नंतर गेली 18 वर्षे त्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. किम यांनी महिला एकेरीच्या आपल्या कारकिर्दीत सुसी सुसांती, बँग सू ह्युंन, कॅमिला मार्टिन, गोंग रुईना, गॉंग झिचाओ यांच्या सारख्या मातब्बर खेळाडूंबरोबर खेळ केला आहे. 

किम जी ह्यून यांनी जगज्जेतेपदाच्या लढती पूर्वी म्हटले होते, कोच हा डॉक्टर सारखा असतो. सिंधूची क्षमता आणि शारीरिक तंदुरुस्ती मजबूत आहे. परंतु माझ्या मते आणखी काही कौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. तिच्या समस्या व उणिवा शोधून त्यावर मी उपाययोजना करत आहे. ती ज्या पद्धतीने खेळते ते पाहून माझं असं मत झाले आहे की, तिला अधिक हुशारीने अथवा चलाखीने खेळण्याची गरज आहे. या स्तरावर खेळाचे तंत्र आणि मानसिकता यांचे सुयोग्य मिश्रण असणे गरजेचे असते. विविध कौशल्ये, फसवे डाव, उचित समयी पवित्रे बदलणे अशा अनेक गोष्टींवर मी काम करते आहे. कारण एकच रणनीती सर्वत्र वापरल्यास जिंकण्याची संधी कमी होते. किम यांनी सिंधू मध्ये शोधलेल्या उणिवा आणि त्यावर दोघींनी केलेली एकत्रित तयारी मोलाची ठरली. सिंधूची उंची 5 फूट 10 इंच आहे. पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेला जपानचा डावखुरा खेळाडू केंटो मोमोटा याची उंची सिंधू पेक्षा १ इंच कमी आहे. थोडक्यात सिंधूच्या बाबतीत उंचीच्या फायद्या-तोट्याचा विचार किम यांना खूप खोलवर करावा लागला असेल. 

Image may contain: 1 person

अजून एक महत्वाची गोष्ट किम यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, काही खेळाडूं विरुद्ध खेळताना अगदी सातत्याने जीव ओतूनच खेळावे लागते. कारण हे खेळाडू अगदी नगण्य चुका करतात. सुसी विरुद्ध खेळणे म्हणजे खूप कठीण. ती खूप मोठ्या रॅलीज खेळे. बिनचूक लॉंग क्लिअर्स आणि ड्रॉप शॉट्स करत असे. या रणनीती मुळे प्रतिस्पर्धी थकतो. सध्या खेळ खूप वेगवान झाला आहे. किम यांनी यामागुची आणि ताई त्सु यिंग या खेळाडूंचे देखील कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, यामागुची बुटकी मुलगी आहे (उंची 5 फूट 1 इंच) पण चलाख आहे. यांच्याकडे शारीरिक तंदुरुस्ती, हुशारी, अनेक कौशल्ये याच बरोबर सौंदर्याने नटलेल्या अनेक युक्तीपूर्ण चाली आहेत. 

 मुळात एकेरी बॅडमिंटन मध्ये पूर्ण कोर्ट नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी शीघ्र व्यावसायिक पद लालित्य असावे लागते. पुण्यातील मॉडर्नच्या बॅडमिंटन कोर्ट वर 20-25 वर्षांपूर्वी राजीव बग्गा, गोपीचंद, मंजुषा पावनगडकर, उदय पवार, हर्षल शिंपी एवढेच काय तर पदुकोण - विमलकुमार यांच्या सारख्या खेळाडूंच्या सरावाच्या किंवा स्पर्धेतील गेम्स पाहणे म्हणजे चाहत्यांना शाही क्रीडा मेजवानी असे. मी त्याचा साक्षीदार असल्याचा मला अभिमान वाटतो. 

जर तुम्ही संथ सुरुवात करत असाल तर कोणतीच संधी नाही. असेही किम यांचे मत आहे.  मुख्य म्हणजे सिंधूचा खेळ हा नैसर्गिकच आक्रमक आहे. यादृष्टीने विचार करता किम - सिंधू जोडी भविष्यात अधिक यशस्वी होईल असे वाटते. किम यांचा प्रदीर्घ अनुभव आणि क्रीडा मानसशास्त्र सिंधूच्या कारकिर्दीच्या दृष्टीने निश्चितच मोलाचा ठरेल. येथे एक गोष्ट नमूद करावी वाटते.  1972 म्युनिच -जर्मनी ऑलिंपिक्स मध्ये रशियाने मानसशास्त्राचा विशेष पुरस्कार केला होता. रशियाच्या 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक्स मधील घवघवीत यशा मागील रहस्य 'क्रीडामानसशास्त्र' मानले जाते. किम स्वतःचे काम केवळ एक तांत्रिक सहकार्य देण्यापर्यंतच मर्यादित ठेऊ इच्छित नाहीत, तर त्या एक प्रोत्साहक आणि सल्लागार बनण्यावर अधिक भर देत आहेत. आपल्या शिष्यांबरोबर त्या जेवतात. शिष्याची हार स्वतःची मानतात तर विजय दोघांचा मानतात. यातूनच त्या गुरु-शिष्य ऋणानुबंध अधिक घट्ट करत असाव्यात. प्रश्न केवळ बॅडमिंटन शिकविण्याचा नव्हे तर जीवन कौशल्ये, सन्मान, एकनिष्ठता, आणि संबंधित सर्व गोष्टी शिकविणे गरजेचे आहे, अशा विचारांच्या त्या आहेत.  

भारतात अनेक क्रीडा प्रकारात असंख्य खेळाडू परदेशी प्रशिक्षकांची मदत घेतात. यशप्राप्ती नंतर अशा प्रशिक्षकांची सरकार दरबारी मान सन्मानासाठी देखील वर्णी लागावी. तसेच रोख बक्षिसासाठी परदेशी प्रशिक्षकाचे नाव आपल्या व्यवस्थेत अधिकृत नोंदविण्याची देखील सोय करावी असे मनोमन वाटते. 


​ ​

संबंधित बातम्या