मला काहीही सिद्ध करायचे नाही : जडेजा

वृत्तसंस्था
Monday, 24 September 2018

विश्‍वकरंडक अजून दूर आहे. तोपर्यंत बरेच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. ज्याप्रमाणे मी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कामगिरी केली त्यात सातत्य राखायचे आहे. सध्या तरी माझ्ये लक्ष आशिया करंडक स्पर्धेवर आहे, अशी पुष्टीही जडेजाने जोडली.

दुबई : भारतीय एकदिवसीय संघातून वगळण्यात आल्याचे दिवस मोजणाऱ्या आणि संधी मिळताच त्याचे सोने करणाऱ्या रवींद्र जडेजाने आपली उपयुक्तता सिद्ध केली; पण मला काहीही सिद्ध करायचे नाही, असे मत व्यक्त करून त्याने परिपक्वताही दाखवली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्याच चार विकेट मिळवून जडेजा सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.

पाकिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामन्यानंतर संघातील स्थान गमावणारा जडेजा जवळपास ४८० दिवस संघाबाहेर होता आणि संधी मिळताच त्याने २९ धावांत चार बळी अशी कामगिरी करून दाखवली. हे पुनरागमन माझ्या निश्‍चितच लक्षात राहणार आहे, कारण जवळपास ४८० दिवसांनंतर मला पुन्हा निळ्या रंगाचे कपडे घालण्याची संधी मिळाली. या अगोदरही मी संघाबाहेर होतो; पण तो कालावधी इतका मोठा नव्हता, असे जडेजाने सामन्यानंतर सांगितले.

यापुढे मला काहीही सिद्ध करायचे नाही. जी गुणवत्ता आणि क्षमता आहे तिला अधिक टोकदार करायचे आहे. मला स्वतःलाच आव्हान द्यायचे आहे, असे जडेजा म्हणतो. पुढील जून महिन्यात होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवडीचा विचार सुरू झालेला असताना जडेजाने निवड समितीला आपली आठवण करून दिली आहे; पण आपण असा विचार करत नसल्याचे त्याने सांगितले.

विश्‍वकरंडक अजून दूर आहे. तोपर्यंत बरेच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. ज्याप्रमाणे मी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कामगिरी केली त्यात सातत्य राखायचे आहे. सध्या तरी माझ्ये लक्ष आशिया करंडक स्पर्धेवर आहे, अशी पुष्टीही जडेजाने जोडली.

​ ​

संबंधित बातम्या