दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांचा विंडीजवर विजय

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

- पूनम राऊतची संयमी फलंदाजी आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी सोमवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज संघावर 51 धावांनी विजय मिळविला.

- तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. 

नॉर्थ साऊंड (अँटिगा) - पूनम राऊतची संयमी फलंदाजी आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी सोमवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज संघावर 51 धावांनी विजय मिळविला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. 
प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 17 अशा खराब सुरवातीनंतर पूनम राऊत, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्या फलंदाजीने भारतीय महिलांना 50 षटकांत 6 बाद 191 धावांची मजल शक्‍य झाली. पूनमने संयमी फलंदाजी करताना 128 चेंडूंत 4 चौकारांसह 77 धावा केल्या. मितालीने 40; तर हरमनप्रीतने 46 धावांची खेळी केली. पूनमने मितालीच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 66, हरमनप्रीतच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 93 धावांची अशा दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. 
आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव कधीच सावरला नाही. शेफानी कॅम्पबेल वगळता त्यांची एकही फलंदाज भारतीय फिरकी त्रिकूटाचा सामना करू शकली नाही. त्यांचा डाव 47.2 षटकांत 138 धावांत आटोपला. राजेश्‍वरी गायकवाड, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या तिघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 
संक्षिप्त धावफलक ः 
भारत 50 षटकांत 6 बाद 191 (पूनम यादव 77, मिताली राज 40, हरमनप्रीत कौर 46, अलिया ऍलेनी 2-38, ऍफी फ्लेचर 2-32) 
वेस्ट इंडीज 47.2 षटकांत 138 (शेफानी कॅम्पबेल 39, स्टेफनी टेलर 20, राजेश्‍वरी गायकवाड 2-27, पूनम यादव 2026, दीप्ती शर्मा 2-25) 


​ ​

संबंधित बातम्या