पटावरच्या महायुद्धात आनंद, हम्पीमुळे भारताला बळ

रघुनंदन गोखले
Monday, 24 September 2018

कार्लसनची अनुपस्थिती
परंतु सगळ्यांना जाणवेल ती जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनची अनुपस्थिती. नोव्हेंबरमध्ये कारुआना विरुद्ध होणाऱ्या जगज्जेतेपदासाठीच्या सामन्याची मॅग्नस जय्यत तयारी करत आहे. तसेच चीनच्या संघाला अनुपस्थिती जाणवेल ती हाऊ ईफान या माजी जगज्जेतीची. एकूण पटावरच्या या महायुद्धात कोणता देश बाजी मारतो ते बघणे म्हणजे बुद्धिबळप्रेमींना एक मेजवानीच असेल!

जॉर्जिया हा सोविएत संघराज्यातून फुटून निघालेला एक छोटा देश, एवढीच सामान्य लोकांना त्याची माहिती असेल; पण बुद्धिबळप्रेमी या ३५ लाख लोकसंख्येच्या देशाला ओळखतात ते एकाहून एक जगज्जेत्या महिला खेळाडूंची खाण म्हणून. माया चिबुर्दनिट्‌झ, नोना गॅप्रिंदाषविली, नाना अलेक्‍सान्ड्रिया अशी नावे आजही लोकांना जुन्या आठवणी करून देतात. अनेक वर्षे आनंदबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करणारा एलिझबार उबिल्व हापण जॉर्जियन!

अशा या बुद्धिबळप्रेमी देशामध्ये उद्यापासून पटावरचे महायुद्ध सुरू होत आहे. पुरुषांमध्ये अमेरिका तर महिलांमध्ये रशियाने पहिले मानांकन मिळविले आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांना पाचवे मानांकन आहे. कधी नव्हे तर भारतीय संघातून खेळण्यासाठी विश्‍वनाथन आनंद आणि कोनेरू हम्पी तयार झाले आहेत आणि त्यामुळे गेल्या वेळी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये चैतन्याची लाट आली आहे.

पुरुष संघात नाशिकचा विदित गुजराथी आणि महिला संघामध्ये पुण्याची ईशा करवाडे भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःची छाप पाडणारा विदित साक्षात मॅग्नस कार्लसनसारख्या जगज्जेत्याला टक्कर देतो. मागील ऑलिंपियाडमध्ये त्याने सुरुवातीचे पाच डाव जिंकून भारताला आघाडीच्या स्थानावर नेले होते. ईशा एक अनुभवी खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या ग्रॅण्डमास्टर्स विरुद्ध टक्कर देऊन तिने गेली कित्येक वर्षे आपले रेटिंग कायम वरती ठेवले आहे. 
तिचा भक्कम खेळ हंपी आणि हरिका यांना विजयासाठी प्रवृत्त करेल.

या वर्षी अंध महिला जागतिक संघामध्ये मुंबईची वैशाली साळावकरचा सहभाग आहे. अंध महिलांचा संघ हा सगळ्या डोळस संघांमध्ये खेळणार आहे. कारण बुद्धिबळ हा खेळ असा आहे की त्यामध्ये अंधांना डोळस खेळाडूंच्या नियमाप्रमाणे खेळावे लागते. 
या संघाची प्रशिक्षिका म्हणून औरंगाबादची नुकतीच आंतरराष्ट्रीय महिला मास्टरचे निकष पूर्ण करणाऱ्या मिताली पाटीलची निवड झाली आहे.

एकूण जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले १८५ संघ पुरुष गटात तर १५१ संघ महिला वर्चस्वासाठी सोमवारपासून लढणार आहेत. अमेरिकेच्या संघामध्ये कारुआना, नाकामुरा, वेस्ली स्लो असे बलाढ्य वीर आहेत. तर रशिया व्लादीमीर क्रॅमनिक, सर्जी करियाकीन असे महारथी उतरवत आहे.

कार्लसनची अनुपस्थिती
परंतु सगळ्यांना जाणवेल ती जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनची अनुपस्थिती. नोव्हेंबरमध्ये कारुआना विरुद्ध होणाऱ्या जगज्जेतेपदासाठीच्या सामन्याची मॅग्नस कार्लसन जय्यत तयारी करत आहे. तसेच चीनच्या संघाला अनुपस्थिती जाणवेल ती हाऊ ईफान या माजी जगज्जेतीची. एकूण पटावरच्या या महायुद्धात कोणता देश बाजी मारतो ते बघणे म्हणजे बुद्धिबळप्रेमींना एक मेजवानीच असेल!

संबंधित बातम्या