आव्हानवीर स्टिफानोसविरुद्ध नदाल 'मास्टर'

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये 6-2, 7-6 (7-4) अशी बाजी मारली. 

टोरांटो : ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये 6-2, 7-6 (7-4) अशी बाजी मारली. 

स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम (ऑस्ट्रिया), नववा मानांकित विंबल्डन विजेता नोव्हाक जोकोविच (सर्बिया), चौथा मानांकित केव्हिन अँडरसन (दक्षिण आफ्रिका) अशा खेळाडूंना हरवीत सलग सनसनाटी निकाल नोंदविले होते. नदालविरुद्ध दुसरा सेट त्याने टायब्रेकमध्ये घालविला, पण नदालने अनुभवाच्या जोरावर त्याला आणखी संधी दिली नाही. नदालच्या पहिल्या आठ सर्व्हिस गेममध्ये स्टिफानोसला तीनच गुण जिंकता आले होते. दुसऱ्या सेटमध्ये नदालला विजेतेपदासाठी सर्व्हिस राखण्याची गरज होती. त्याचवेळी स्टिफानोसने ब्रेक मिळविला. हा सेट टायब्रेकमध्ये गेला. त्यात नदालने "मिनी-ब्रेक'च्या पिछाडीवरून झुंजार खेळ केला. त्याने एक तास 42 मिनिटांत सामना जिंकला. 
स्टिफानोस आणि नदाल एप्रिलमध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या वेळी नदालने 4-1 अशी भक्कम आघाडी घेत स्टिफानोसवरील दडपण वाढविले. पहिला सेट त्याने 34 मिनिटांतच जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेक मिळवीत त्याने सलग 20 गुण जिंकले. 5-4 वरून नदालने सर्व्हिस गमावली, तर 6-5 अशा स्थितीस एक सेटपॉइंट वाचविला. पहिल्याच मॅचपॉइंटला त्याने "क्रॉस-कोर्ट विनर' मारला. 

संबंधित बातम्या