अमेरिकन ओपन : नदालने पटकाविले 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

नदालचे हे कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे. याबरोबरच तो आणि स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर यांच्यातील फरक केवळ एक पर्यंत कमी झाला. फेडररच्या खात्यात वीस विजेतीपदे आहेत.

न्यूयॉर्क : स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याने कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले. अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने डॅनील मेदवेदेव या रशियन आव्हानवीराला पाच सेटमध्ये हरवून बाजी मारली. नदालने 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा विजय संपादन केला. हा सामना 4 तास 49 मिनिटे चालला.

दोन सेटच्या आघडीनंतर नदालने क्वचितच हार मानली आहे, तर मेदवेदेव याला पाच सेटमध्ये अद्याप या पातळीवर विजय मिळविता आलेला नाही. मेदवेदेवचा उत्तर अमेरिकन हार्डकोर्ट मोसमातील 23 सामन्यांतील हा तिसराच पराभव आहे. मोक्याच्या क्षणी मात्र नदालने त्याला आपला दर्जा दाखवून दिला.

नदालचे हे कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे. याबरोबरच तो आणि स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर यांच्यातील फरक केवळ एक पर्यंत कमी झाला. फेडररच्या खात्यात वीस विजेतीपदे आहेत.

नादलचे हे चौथे अमेरिकन विजेतेपद आहे. नदालने यापूर्वी 2017, 2013 आणि 2010 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

​ ​

संबंधित बातम्या