सिंधूसाठी जेतेपदाची स्वप्नपूर्ती दूरच 

वृत्तसंस्था
Sunday, 21 July 2019

सिंधूने उपांत्य लढतीत सुरवातीच्या पिछाडीनंतर यशस्वी प्रतिकार केला होता. अंतिम लढतीत नेमके उलटे घडले. पहिल्या गेमच्या ब्रेकला तीन गुणांची आघाडी सिंधूकडे होती, पण त्यानंतरच्या सतरा गुणांपैकी चारच गुण सिंधूला जिंकता आले. दुसऱ्या गेममध्ये यामागुचीचे ताकदवान स्मॅशेस रोखण्यात सिंधू कमी पडली, तसेच यामागुचीने तिला बॅकहॅंडच्या जाळ्यात पकडले.

जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ केल्यावर सिंधूला जपानच्या अकेन यामागुचीविरुद्ध वर्चस्व राखता आले नाही. मोक्‍याच्या वेळी केलेल्या चुकांचा फटका आपल्याला बसल्याची सिंधूने सामन्यानंतर दिलेली कबुलीच अंतिम लढतीचे चित्र दाखविण्यास पुरेशी आहे. 

सिंधूने उपांत्य लढतीत सुरवातीच्या पिछाडीनंतर यशस्वी प्रतिकार केला होता. अंतिम लढतीत नेमके उलटे घडले. पहिल्या गेमच्या ब्रेकला तीन गुणांची आघाडी सिंधूकडे होती, पण त्यानंतरच्या सतरा गुणांपैकी चारच गुण सिंधूला जिंकता आले. दुसऱ्या गेममध्ये यामागुचीचे ताकदवान स्मॅशेस रोखण्यात सिंधू कमी पडली, तसेच यामागुचीने तिला बॅकहॅंडच्या जाळ्यात पकडले. उपांत्य लढतीत चेनचा हाच प्रयत्न सिंधून अपयशी ठरवला होता. अखेर सिंधूला चौथ्या मानांकित यामागुचीविरुद्धच्या अंतिम सामन्यात 15-21, 16-21 अशी हार पत्करावी लागली. दोघीतील पंधरा लढतीतील सिंधूची ही केवळ पाचवी हार आहे. 

भारतीयांना भरपूर प्रेम लाभणाऱ्या या स्पर्धेत साईना नेहवालने तीनदा विजेतेपद जिंकले आहे. सिंधूने डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. आता ती या स्पर्धेतीलही तसेच या वर्षातील पहिले विजेतेपद जिंकेल, असे वाटत होते; प्रत्यक्षात सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतवर्षी तिला जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, थायलंड ओपन तसेच इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

सिंधूच्या खेळात सुरवातीपासून सातत्य नव्हते. तिने 0-3 पिछाडीवरून 5-4 आघाडी घेतली, पण 7-7 बरोबरी झाली. पण तिने विश्रांतीस 11-8 आघाडी घेतली. यामागुचीने अडखळत का होईना 14-14 बरोबरी साधली. त्यानंतर यामागुचीने सिंधूचा बॅकहॅंड लक्ष्य केला. सिंधूला त्यानंतर सहापैकी एकच गेम पॉइंट वाचविल्याचे समाधान लाभले. 

जेव्हा गुण मिळणार होते, त्या वेळी माझ्याकडून चूक झाली. शटल काहीसेच बाहेर जात होते. ती शटलपर्यंत पोचत नव्हती, त्या वेळीही शटल बाहेर जात होते. हे गुण मी जिंकले असते, तर चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. ओकुहाराचा खेळही वेगळा होता. आमच्या रॅलीज झाल्या, पण त्या वेगवान होत्या. पहिल्या गेममधील चुकांचाच मला फटका बसला, असे सिंधूने सांगितले. 

पहिल्या गेमच्या सुरवातीस 27 आणि 31 शॉटस्‌ची रॅली यामागुचीने जिंकल्यामुळे सिंधू आक्रमक होती. तिचा भर रॅली झटपट संपविण्याकडेच सतत होता. दुसऱ्या गेमचा स्कोअर चुरस दाखवत असला, तरी सिंधू कायम प्रतिकार करीत होती. ती 1-4, 5-8, 10-15 अशीच यामागुचीला गाठण्याचा प्रयत्न करीत होती. याचवेळी एक 51 शॉटस्‌ची रॅली झाली, तीही यामागुचीने जिंकली. उजव्या गुडघ्यावर लढतीदरम्यान उपचार करून घेतलेल्या यामागुचीने जिद्दीने खेळत आघाडी वाढवत सामना जिंकला. 

अंतिम लढतीतील अनुभव नक्कीच मोलाचा ठरेल. अर्थात या स्पर्धेतील कामगिरीने माझा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला आहे. ऑलिंपिक पात्रतेमुळे प्रत्येक जण सर्वस्व पणास लावत आहे. जपान ओपनमध्ये या स्पर्धेपेक्षा सरस कामगिरी होईल अशी आशा आहे. गेल्या काही महिन्यांत सामने जास्त लांबत आहेत. आता खेळातील संयम महत्त्वाचा झाला आहे. 
- पी. व्ही. सिंधू 
 


​ ​

संबंधित बातम्या