सिंधूचा पराभव, प्रणीतचा दिलासा

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019
चँगझोऊ ः पी व्ही सिंधू चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील विजयापासून दोन गुण दूर होती, पण त्याचवेळी तिने सलग सहा गुण गमावत आवाक्‍यात आलेला विजय दवडला. सिंधूच्या पराभवामुळे महिला एकेरीतील भारताचे आव्हान आटोपले.
चँगझोऊ ः पी व्ही सिंधू चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील विजयापासून दोन गुण दूर होती, पण त्याचवेळी तिने सलग सहा गुण गमावत आवाक्‍यात आलेला विजय दवडला. सिंधूच्या पराभवामुळे महिला एकेरीतील भारताचे आव्हान आटोपले.
चॅंगझोऊ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत जागतिक विजेत्या सिंधूची तीन गेममधील हार धक्कादायक होती. सलामीच्या फेरीत तिने कमालीची आक्रमकता दाखवली होती, पण यावेळी तिने मोक्‍याच्यावेळी ताकदवान फटके का टाळले हे समजू शकले नाही. त्यामुळे तिला पहिला गेम जिंकल्यावरही हार पत्करावी लागली. तिला थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवॉंग याच्याविरुद्ध 21-12, 13-21, 19-21 अशी हार पत्करावी लागली. त्यापूर्वी सात्विकसाईराज रांकीरेड्डीला दुहेरीत दुहेरी हार पत्करावी लागली होती. मात्र बी साई प्रणीतने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठत भारताचे आव्हान कायम ठेवले.

सिंधून पॉर्नपावीविरुद्धच्या यापूर्वीच्या तीनही लढती जिंकल्या होत्या, पण यावेळी विजय सोपा नसल्याचा इशारा तिला पहिल्या गेममध्येच मिळाला होता. तिची 7-1 आघाडी 11-10 अशी कमी झाली होती, पण त्यानंतर सलग नऊ गुण जिंकले, त्यावेळी लढत सोपीच होईल असे वाटले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने 1-5 पिछाडी 7-9 कमी केली, पण सलग सहा गुण गमावल्यानंतर गेम निसटणार असल्याची जाणीव तिला झाली. निर्णायक गेममध्ये 6-6 बरोबरीनंतर सिंधूने 11-7 आघाडी घेतली आणि ती 19-15 केली, पण यावेळी तिच्याकडून असलेली आक्रमकता दिसली नाही अन्‌ गेम तसेच लढत गमावण्याची वेळ आली.
बी साई प्रणितने भारताच्या स्पर्धेतील आशा राखताना लि गुआंग याला 21-19, 21-19 असे 48 मिनिटात पराजित केले. गुआंगने प्रणीतला गतवर्षीच्या सय्यद मोदी स्पर्धेत पराजित केले होते, पण यावेळी दोनही गेममध्ये मोक्‍याच्यावेळी खेळ ऊंचावत प्रणीतने आगेकूच केली.
सात्विकसाईराजची दुहेरीतील दुहेरी हारही भारतास सलणारी होती. पुरुष दुहेरीत सात्विक - चिराग शेट्टी चौथ्या मानांकित प्रतिस्पर्ध्यांना पहिल्या गेममध्येच लढत देऊ शकले, तर मिश्र दुहेरीत सात्विक - अश्वीनी पोनप्पा तीन गेमच्या लढतीत जपानच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्द पराभूत झाले. दुसरा गेम जिंकल्यावर भारतीय जोडीचा तिसऱ्या गेममध्ये प्रभाव पडला नाही.


​ ​

संबंधित बातम्या