प्रो-कबड्डी - पलटणने विजय केला कठीण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

- प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात उत्तरार्धात संथ खेळण्याची किंमत आतापर्यंत मोजावी लागलेल्या पुणेरी पलटण संघाने गुरुवारीदेखील वर्चस्व राखलेला सामना कठीण करत अखेर निसटता विजय पदरात पाडला.

- मनजीत आणि सुशांत शेल यांच्या खोलवर चढाया आणि कर्णधार सुरजितचा भक्कम बचाव या जोरावर पलटणने पूर्वार्धात आपले जबरदस्त वर्चस्व राखले

- सिद्धार्थ देसाई अपयशी ठरत असतानाही राकेश गौडाने उत्तरार्धात तुफानी चढाया करून पूर्वार्धात भक्कम असलेल्या पलटणच्या बचावावर दडपण आणले.

पंचकुला -  प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात उत्तरार्धात संथ खेळण्याची किंमत आतापर्यंत मोजावी लागलेल्या पुणेरी पलटण संघाने गुरुवारीदेखील वर्चस्व राखलेला सामना कठीण करत अखेर निसटता विजय पदरात पाडला. त्यांनी आज झालेल्या सामन्यात विश्रांतीच्या 15 गुणांच्या मोठ्या आघाडीनंतर शेवटी 53-50 अशा विजयावर समाधान मानले. 
विश्रांतीला मोठी आघाडी घ्यायची आणि सामन्याच्या उत्तरार्धात सामना संथ करून हातातोंडाशी आलेला विजय कधी घालवायचा, तर कधी बरोबरीवर समाधान मानायचे, अशीच पुणेरी पलटण संघाची अवस्था यंदाच्या मोसमात दिसून आली होती. आजच्या सामन्यातही फार काही वेगळे झाले नाही. फरक इतकाच की या वेळी सामना जिंकण्यात पुणे संघाला यश आले. 
मनजीत आणि सुशांत शेल यांच्या खोलवर चढाया आणि कर्णधार सुरजितचा भक्कम बचाव या जोरावर पलटणने पूर्वार्धात आपले जबरदस्त वर्चस्व राखले. विश्रांतीला त्यांनी 31-16 अशी आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात पलटणचे पहिले पाढे पंचावन्न ठरले. मोठ्या आघाडीच्या नादात त्यांनी सामना संथ केला आणि राखलेले वर्चस्व गमावले. सिद्धार्थ देसाई अपयशी ठरत असतानाही राकेश गौडाने उत्तरार्धात तुफानी चढाया करून पूर्वार्धात भक्कम असलेल्या पलटणच्या बचावावर दडपण आणले. राकेश गौडाला (16 गुण) इराणी फरहाद मिलाघरदनची (10 गुण) साथ मिळाली. त्याच्या उत्तरार्धातील चढाया निर्णायक ठरल्या. त्यांना तेलगूच्या दुसऱ्या फळीतील आकाश अश्रुल, कृष्णा मदने यांची साथ मिळाली. त्यामुळे पूर्वार्धात चढाई आणि बचावात पूर्ण वर्चस्व राहिलेल्या पलटणला सामन्याच्या शेवटी या दोन्ही आघाड्यांवर 31-31 आणि 15-15 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. दोन लोणही त्यांनी स्वीकारले; पण, सरतेशेवटी तेलुगूवर तीन लोण चढविल्याचाच फायदा पुणे संघाला झाला. 
 


​ ​

संबंधित बातम्या