नागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 December 2018

पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील.

भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात कांकणभरही कमतरता नव्हती. 

पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील.

भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात कांकणभरही कमतरता नव्हती. 

सुरवातीला अगदीच अंधार असला तरी दिवस उजडायला सुरवात झाली तसा नागरिकांमधील उत्साहही ओसंडून वाहू लागला होता. अगदीच सुरवातीच्या टप्प्यात बाणेर फाट्याच्या काहीसे पुढे गेल्यावर उत्साही नागरिकांनी लाऊड स्पीकरवरून ठेका धरायला लावलेली गाणी वाजवून चाहत्यांचे स्वागत केले. अर्थात, या गाण्यांच्या आवाजाचा शेजारच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजीदेखील घेतली होती. शर्यत ब्रेमेन चौकातून परतीच्या मार्गावर आली तेव्हा या ठिकाणी बॅंड पथकाने देशभक्तीपर गाणी वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. औंध- बोपोडी प्रभाग क्रमांक आठचे स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी यात पुढाकार घेतला होता. त्यापूर्वी, एसआयएलसीवरून शर्यत पुढे जात असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या पीएमटीमधून एका उत्साही पुणेकराने हात बाहेर काढून धावणाऱ्या धावपटूंना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात ‘क्‍लिक’ केले. 

परिहार चौकातून शर्यत पुढे जात असताना नागरिकांचा उत्साह अधिक वाढलेला होता. मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक आवर्जून थांबून या धावपटूंचे टाळ्या वाजवून कौतुक करत होते. त्याचबरोबर लहान मुलांची चिमुकली पावलेदेखील आजी- आजोबांचा हात धरून, तर कधी कडेवर बसून मॅरेथॉनचा आनंद घेत होती. ‘आजोबा, हे कोण धावत आहेत,’ असे बोबडे स्वरही बाणेर रस्त्यावरून शर्यत वळत असताना कानावर पडले. 

या सर्व उत्साही नागरिकांमध्ये सर्वांत नजरेत भरली ती तरुणाईची मदतीची साथ. पोलिस प्रशासन आणि संयोजकांचा भार हलका करत ही तरुणाई दिवस उजाडल्यावर वाहतुकीच्या नियंत्रणातही पुढे सरसावलेली दिसून आली.

‘सेलिब्रेटिंग वुमनहुड’
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या होम सायन्स महाविद्यालयातील जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थिनी मोठ्या जल्लोषात पुणे हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनमध्ये सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयाच्या ‘सेलिब्रेटिंग वुमनहुड’ या अभियानांतर्गत विद्यार्थिनी निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनमधील सहा किलोमीटर धावण्याचा पल्ला विद्यार्थिनींनी पूर्ण करत जल्लोष केला. ‘‘आम्ही मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहोत. प्रत्यक्ष मॅरेथॉन पाहण्याचाही हा पहिलाच अनुभव. उत्साही वातावरण पाहून आमचाही उत्साह वाढला. खूप फ्रेश आणि छान वाटले,’’ असा अनुभव विद्यार्थिनी देविका देशपांडे हिने सांगितला.

आयुष्यात पहिल्यांदाच मी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. किंबहुना यापूर्वी कधीही मॅरेथॉन प्रत्यक्ष पाहिली नव्हती किंवा अनुभवली नव्हती. ‘फॅमिली रन’च्या निमित्ताने हा आनंद घेता आला. वय वर्षे ६७ असतानाही मी आज सहा किलोमीटर धावू शकले याचे समाधान वाटत आहे.
-सुजाता सहस्रबुद्धे , भुसारी कॉलनी 

कुटुंबीयांसमवेत मी मॅरेथॉनमध्ये यंदा पहिल्यांदाच सहभागी झालो आहे. फिटनेससाठी असणारी ही स्पर्धा निश्‍चितच उत्साह आणि प्रोत्साहन देणारी आहे. यानिमित्ताने निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, आता आमचे संपूर्ण कुटुंबदेखील दररोज व्यायामाला महत्त्व देईल.’’
-विनोद पटेल, वारजे 

भल्या पहाटे मॅरेथॉनसाठी आल्यामुळे खूप फ्रेश वाटत आहे. क्रीडांगणातील वातावरणही खूप जल्लोषाचे असल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. झुंबा नृत्याच्या साहाय्याने ‘वॉर्म अप’ होताना एक वेगळाच आनंद मिळत आहे. आमचा मोठा परिवार या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला असून, खूप मजा आली.
-श्‍वेता सनंसे, वानवडी

गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी सहा ते आठ व्यायाम करतो. पाच किलोमीटर सायकलही चालवतो. बहुतेक कामे सायकलवरूनच करतो. ‘फॅमिली रन’ ३५ मिनिटांत पूर्ण केली, त्यामुळे अत्यानंद झाला.
- रंगराव काळूगडे

अनेक वर्षांपासून दररोज सकाळी योगा, प्राणायाम करते, त्यामुळे दिवसभर काम करताना थकवा येत नाही. या मॅरेथॉनमधील ‘फॅमिली रन’ ही स्पर्धा ४५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. यातून मला नवीन ऊर्जा मिळाली. 
- डॉ. मीना विधळे

दररोज सकाळी एक तास व्यायाम करतो. तसेच योग, प्राणायामही करतो, त्यामुळे या वयातही मी ‘फिट’ आहे. या मॅरेथॉनमध्ये मी आणि माझ्या पत्नीने भाग घेऊन ‘फॅमिली रन’ पूर्ण केली. स्पर्धेतून धावण्याची ऊर्जा मिळाली. यापुढे मी नियमित धावणार आहे.
- जयंत शेटे 

स्पर्धेचा आनंद घेत ‘फॅमिली रन’ ५० मिनिटांमध्ये पूर्ण केली. नियमित व्यायाम, दोन वेळा जेवण. त्यामुळे मी तंदुरुस्त आहे. या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतल्याचे पाहून आनंद झाला. 
- दीपक चिटणीस

नवचैतन्य हास्य क्‍लबच्या शहराच्या वेगवेगळ्या भागांतील शाखेतील ३५३ सदस्यांनी पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. त्यासाठी प्रमोद ठेपे, हरीश पाठक आणि सुनील देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहामध्ये ‘फॅमिली रन’ स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ‘सकाळ’ने ही स्पर्धा अशीच सुरू ठेवावी. यातून प्रत्येकास व्यायामाची प्रेरणा मिळते.
- मकरंद टिल्लू, विश्‍वस्त, नवचैतन्य हास्य योग परिवार

आमच्या हास्य क्‍लबच्या बहुसंख्य सदस्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे दाखवून देता आले. पुढील वर्षी सर्व पुणेकरांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
- विजय गधो


​ ​

संबंधित बातम्या