क्रीडा संकुल कुटुंबमय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 December 2018

पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या सर्वांचा होता. शर्यतीमधील २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या शर्यती संपत असतानाच ही सगळी पावले ‘फॅमिली रन’साठी वळू लागली. 

पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या सर्वांचा होता. शर्यतीमधील २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या शर्यती संपत असतानाच ही सगळी पावले ‘फॅमिली रन’साठी वळू लागली. 

अंतिम रेषेवर ही सगळी पावले थबकली होती. शर्यत सुरू होण्यास अवधी असतानाच या समस्त पुणेकरांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर थ्री... टू... वन काउंट डाउन सुरू झाला आणि बरोबर सकाळी सव्वासातच्या ठोक्‍याला क्रीडा ंकुलातील रस्त्यांसह अवघा बाणेर परिसर कुटुंबमय होऊन गेला. 

एरवी धावण्याचा फारसा सराव नसतानाही प्रत्येकाने सहा किलोमीटरचा पल्ला कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा चंगच बांधला होता. यात आपल्या कुटुंबीयांसमवेत आलेल्या नागरिकांबरोबरच असंख्य तरुण- तरुणीदेखील गटा-गटाने आल्याचे पाहायला मिळाले. ‘पुणे हेल्थ डे’चे औचित्य साधून बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील ‘फॅमिली रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास दहा हजार नागरिक या वेळी धावले. फिटनेस आणि वेलनेस या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या ‘फॅमिली रन’मध्ये नागरिकांसमवेत महापौर मुक्ता टिळक, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पिंपरी- चिंचवडच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, अभिनेत्री विभावरी देशपांडे, नगरसेवक अमोल बालवडकर कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.

‘फॅमिली रन’पूर्वी झालेली दिव्यांग जवानांची व्हीलचेअर शर्यतही उपस्थितांची दाद देऊन गेली. ‘फॅमिली रन’मधील नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेत्री मंदिरा बेदी यादेखील व्यासपीठावर आल्या. ‘मुंबई, दिल्ली यापेक्षा पुण्यातील ही मॅरेथॉन वेगळी असून, आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी धावणे महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी सहभागी धावपटूंना ‘चिअर अप’ केले. त्यांच्या उपस्थितीने नागरिकांचा उत्साह अधिकाधिक वाढला. विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणी, संपूर्ण कुटुंब, हास्य क्‍लबचे सदस्य समूहानेच क्रीडा संकुलातून बाहेर पडत बाणेरच्या रस्त्यावर उतरले आणि उत्साह, जल्लोष, चैतन्याचा अनुभव शर्यत बघण्यासाठी आलेल्यांनीही अनुभवला. हा उत्साह स्पर्धा संपेपर्यंत उत्तरोत्तर वाढत गेला. 

बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत
अवघ्या चार-पाच वर्षांची लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत, तर वयाची सत्तरी- पंच्चाहत्तरी पार केलेले आजी-आजोबा मुले आणि नातंवडांसह या मॅरेथॉनमध्ये धावले. फिटनेसचे महत्त्व लक्षात घेऊन दररोज नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी हा अनुभव नवी पर्वणीच ठरला. अवघ्या काही मिनिटांत सहा किलोमीटरचा पल्ला गाठत धावपटू बनलेल्या उत्साही पुणेकरांनी अंतिम रेषा गाठली आणि परतताना रोज व्यायाम करण्याचा वसाच ते घेऊन गेले. 

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमधील सहभागी कुटुंबांतील उत्साह पाहण्यासारखा होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी झाले होते. असा उत्साह आणि आनंद कधीही विकत घेता येत नाही, तो अनुभवायचा असतो. तो अनुभव आज या सगळ्या सहभागी स्पर्धक आणि शर्यत बघणाऱ्यांनी घेतला. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. नागरिकांना चांगले वातावरण दिले, की ते सहभाग नोंदवतातच आणि हे सकाळ आयोजित पुणे हाफ मॅरेथॉनने स्पष्ट केले. 
- प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष

पुणे हाफ मॅरेथॉन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यानिमित्ताने फिटनेस आणि शहर स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविता आला. पुणेकर नागरिक आणि खेळाडू या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘सकाळ’ नेहमीच नागरी हिताचे उपक्रम राबवितो. आजचा उपक्रमही त्याचाच एक भाग होता.
- सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका

पुणे हाफ मॅरेथॉन हा एक उत्साहवर्धक अनुभव होता. व्यवस्थापन अत्यंत नेटके होते. प्रत्येक किलोमीटरला पिण्याचे पाणी, फळे, स्वच्छतागृहे होती. मॅरेथॉनमार्गावरही काही अडचणी आल्या नाहीत, त्यामुळे स्पर्धकांना मॅरेथॉन खऱ्या अर्थाने एन्जॉय करता आली. या मॅरेथॉनचा पुणे मेट्रोला एक भाग होता आले, ही अभिमानाची बाब आहे. 
- रामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो 

हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात फिटनेसला फार महत्त्व आहे. अशा उपक्रमांमुळे फिटनेसबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच, शहर आणि जिल्ह्यातील नागरिक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र असल्यामुळे त्यांच्यात सांघिक भावनाही निर्माण होण्यास मदत होते.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

मॅरेथॉनच्या आयोजनामुळे संपूर्ण शहरात चांगले वातावरण निर्माण झाले होते. धावपळीच्या जीवनात फिटनेसबाबत नागरिकांमध्ये जागृती होत आहे. त्यातून शहरातील वातावरण निरोगी आणि आरोग्यदायी होण्यास नक्कीच मदत होईल.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी

पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पुणेकरांकडून कायम निरोगी आरोग्याला प्राधान्य दिले जाते, हे स्पर्धेतून स्पष्ट झाले. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही यात आवर्जून सहभाग घेतला.
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त

वाहतूक नियमनासाठी पुण्यातील अडीचशेहून अधिक पोलिस अधिकारी- कर्मचारी कार्यरत होते. स्पर्धेदरम्यान पहिल्यांदाच ‘लेन क्‍लोजर’ प्रयोग राबविला, त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकली. मॅरेथॉन मार्गावरील मुख्य रस्त्यावर स्पर्धकांची गर्दी होती, त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक थांबविली होती. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

शहरातील नागरिकांसाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. निरोगी आयुष्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्‍यक आहे. याबाबत नागरिकांमध्ये अशा उपक्रमांतून जागृती होण्यास मदत झाली आहे. तरुणांना आपले आरोग्य चांगले राखण्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला आहे.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

पुणे हाफ मॅरेथॉनला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यातून शहर स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे. आरोग्य आणि स्वच्छता हे एकमेकांशी निगडित असून, त्याबाबत नागरिकांमध्ये यानिमित्ताने जागृती करण्यास मदत झाली.
- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका

समाजातील घटकांना मोठ्या प्रमाणात एकत्र आणणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. शहरातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणून या मॅरेथॉनची नोंद होईल. उत्तम आरोग्यासाठी धावणे हा व्यायाम चांगला आहे. अशा उपक्रमांतून लोक एकत्र येऊ शकतात. मात्र, त्यासाठी पुढाकाराची गरज असते. तो घेतल्यास अशा प्रकारचे उत्साही वातावरण निर्माण होऊ शकते, हे यानिमित्ताने दिसून आले. मॅरेथॉनची व्याप्ती वाढली पाहिजे, त्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल. 
- गिरीश बापट, पालकमंत्री 

प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत किती जागरूक आहे, ही बाब स्पष्ट करणारी ही मॅरेथॉन आहे. हा ‘इव्हेंट’ न करता महत्त्वपूर्ण उपक्रम झाला. आरोग्यासाठी सायकलिंग, धावणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मी स्वतः आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतो. तशी काळजी अनेकजण घेत आहेत, हे पाहून आनंद झाला. हा उपक्रम पुणेकरांसाठी स्तुत्य आहे. 
- अनिल शिरोळे, खासदार 

धावपळीच्या आयुष्यात आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे, याची जाणीव करून देत, लोकांना एकत्र आणल्याबद्दल अभिनंदन. लोक एकमेकांपासून लांब जात असताना या मॅरेथॉनमुळे त्यांना जोडल्याचे चित्र दिसून आले. यातील ‘फॅमिली रन’ ही संकल्पना उपयुक्त ठरणारी आहे. धावण्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पुणेकरांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला, हे त्यांना काय अपेक्षित आहे, हे यातून दिसून आले. 
- मुक्ता टिळक, महापौर   

पुणेकरांचे रोजचे जगणे आनंददायी व्हावे, यादृष्टीने या मॅरेथॉनला महत्त्व आहे. अशा कार्यक्रमांची व्याप्ती वाढवून निरनिराळ्या घटकांना जोडण्याची मोहीम सुरू राहिली पाहिजे. पुणेकर आपल्या आरोग्याबाबत किती जागृत आहेत, हे गर्दीने दाखवून दिले आहे.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका


​ ​

संबंधित बातम्या