इडन गार्डनवर गुलाबी चेंडूतील सामन्याच्या पूर्वतयारीसही सुरवात
ही फार मोठी घडामोड आहे. कसोटी क्रिकेटची प्रगती व्हायला हवी माझ्यासह माझा संघही त्यास अनुकुल होता. विराट कोहलीने प्रकाशझोतातील सामना खेळण्याची तयारी दाखवल्यामुळे त्याचेही आभार.
-सौरव गांगुली, बीसीसीआयचे अध्यक्ष
कोलकता : सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होताच नवे बदल झपाट्याने होऊ लागले आहे. आत्तापर्यंत कधीही विचार न केलेला प्रशाशझोतातील कसोटी सामना ऐतिहासिक इडन गार्डनवर होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.
कोणत्या बनावटीचा चेंडू वापरावा तसेच सायंकाळी पडणारे दव अशा अडचणी असतानाही गांगुली यांनी देशातील पहिल्या वहिल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याच्या संकल्पनेला मुर्त स्वरुप दिले. बांगलादेश क्रिकेट संघटनेशी चर्चा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्यात गांगुली यांना यश आले. भारताप्रमाणे बांगालदेशही अद्याप प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळलेले नाही.
भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासून प्रकाशझोतातील कसोटीसाठी आपण आग्रही असल्याचे सौरव गांगुली यांनी सूचीत केले आहे. त्यांनी याबाबत नुकतीच कर्णधार विराट कोहलीसह चर्चाही केली. प्रकाशझोतातील कसोटीबाबत भारतीय मंडळाने विचारणा केली असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितले होते आहे, पण याबाबत खेळाडूंबरोबर चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
आम्ही प्रकाशझोतातही कसोटी घेण्याची पूर्वतयारी करीत आहोत, असे सुजन यांनी सांगितले मात्र एकंदरीतच पूर्वतयारीत पावसाचा अडथळा असल्याचेही ते म्हणाले. अर्थात कसोटी अद्याप तीन आठवडे दूर आहे असे त्यांनी सांगितले. कोलकतामधील क्रिकेट अभ्यासक नोव्हेंबरच्या अखेरीस थंडी वाढलेली असेल, त्यावेळी दवही जास्त पडते याकडे लक्ष वेधत आहेत. कसोटी दर्जा असलेल्या देशांपैकी केवळ चारच संघ प्रकाशझोतातील कसोटी खेळलेले नाहीत. त्यात भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड आहेत.
भारतीय कर्णधार विराट कोहली, मार्गदर्शक रवी शास्त्री यांचा प्रकाशझोतातील कसोटीस विरोध होता. त्यामुळे भारतीय संघाने ऍडलेडमध्ये तसेच राजकोटला वेस्ट इंडिजविरुद्धचा प्रकाशझोतातील कसोटीचा प्रस्ताव नाकारला होता, पण आता गांगुलीने कोहलीचे मन वळवले असल्याचे दिसत आहे. भारतीय मंडळाने प्रकाशझोतातील कसोटीबाबत विचारले आहे. अंतिम निर्णय संघव्यवस्थापनाबरोबरील चर्चेनंतर होईल, असे बंगाल संघटनेचे सीईओ निझामुद्दीन यांनी सांगितले.
दर्जेदार गुलाबी चेंडूवर सर्व अवलंबून
भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्यातही एसजी चेंडूचा वापर होतो. एसजीचे गुलाबी चेंडू दर्जेदार नाहीत, असा आक्षेप घेतला जात आहे. एका कसोटीसाठी सरावासह एकंदर 24 चेंडूंची गरज असते. त्याशिवाय काही चेंडू राखीव म्हणून ठेवावे लागतात. आता एवढे चांगले एसजी गुलाबी चेंडू उपलब्ध होतील का याच प्रश्नाने भारतीय मंडळाचे त्रस्त आहेत.
गुलाबी चेंडूची प्रतिकुलता
- पारंपारीक कसोटीचा लाल चेंडू ग्रीसमध्ये बुडवला जातो, पण ग्रीसमुळे गुलाबी रंग फिका पडतो. त्याऐवजी गुलाबी रंग मूळच्या चेंडूवर स्प्रे केला जातो, पण तो रंग हळूहळू फिका पडत जातो
- गुलाबी चेंडू सुरुवातीच्या षटकात कमालीचा स्विंग, पण चेंडू मर्यादेची निम्मी षटके होईपर्यंत स्विंग लुप्त आणि रिव्हर्स स्विंगही अशक्य
- गुलाबी चेंडू जुना झाल्यावर फारसा फिरकही घेत नाही
- दुबईतील प्रकाशझोतातील कसोटी फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील कसोटीत मध्यमगती गोलंदाजांचे.
- संधीप्रकाशात फलंदाजी कमालीची कठीण असल्याची तक्रार, त्यावेळी चेंडू जास्त स्वींगही होतो