इंचॉन एशियाडमुळे माझे जीवन समृद्ध 

प्रार्थना ठोंबरे 
Sunday, 12 August 2018

इंचॉनमधील स्पर्धेच्या आठवणी रम्य आहेत. कारकिर्दीत प्रथमच एका मोठ्या स्पर्धेत मी खेळत होते आणि ते सुद्धा माझ्या आयडॉलबरोबर. तेव्हा भारतीय पथक एका इमारतीत राहात होते. आमच्या इमारतीसमोर तिरंगा झळकाविण्यात आला होता. स्टेडियमला येताना आणि जाताना तिरंगा पाहून फार छान वाटायचे. एरवी "टूर'वर एकटे खेळताना असे क्षण आमच्या वाट्याला येत नाहीत. 

कारकिर्दीत मी सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. यादरम्यानच्या वाटचालीत एक ऑलिंपिक झाले. या स्पर्धेसाठी मी खरोखरच फार आतुर झाले आहे. इंचॉनमध्ये सानिया मिर्झाच्या साथीत मी ब्रॉंझपदक जिंकले होते. या वेळी मी "सानिया दी'ला मिस करेन. तिच्यासह खेळताना खूप काही शिकायला मिळते. या वेळी मी लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णा यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा माझा प्रयत्न असेल. मी दुहेरी आणि मिश्र दुहेरीत खेळेन. माझे जोडीदार कोण असतील हे अद्याप नक्की नाही, पण प्रत्येकाचा खेळ मला ठाऊक आहे. त्यामुळे मला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे. मी हैदराबादमधील सानिया मिर्झा टेनिस ऍकॅडमीत इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला आहे. 

इंचॉनमधील स्पर्धेच्या आठवणी रम्य आहेत. कारकिर्दीत प्रथमच एका मोठ्या स्पर्धेत मी खेळत होते आणि ते सुद्धा माझ्या आयडॉलबरोबर. तेव्हा भारतीय पथक एका इमारतीत राहात होते. आमच्या इमारतीसमोर तिरंगा झळकाविण्यात आला होता. स्टेडियमला येताना आणि जाताना तिरंगा पाहून फार छान वाटायचे. एरवी "टूर'वर एकटे खेळताना असे क्षण आमच्या वाट्याला येत नाहीत. 

त्या पहिल्या मल्टी स्पोर्टस इव्हेंटचा आनंद मी पुरेपूर लुटला. आपली बॉक्‍सर मेरी कोम हिची उपांत्य लढत पाहायला मी गेले होते. ती जिंकल्यानंतर मी तिला भेटलेसुद्धा होते आणि तिच्याबरोबर फोटोसुद्धा काढला होता. तिने नंतर सुवर्णपदक जिंकले. आपल्या देशाची ती "चॅंपियन' असल्यामुळे आणि तिला भेटल्यामुले फार छान वाटले. नंतर मी पुरुष हॉकीचा अंतिम सामनासुद्धा पाहिला. अंतिम फेरीत आपण पाकिस्तानला हरविले. त्या सुवर्णपदकाचा जल्लोष काही औरच होता. 

इंचॉनच्या त्या स्पर्धेने टेनिसपटूच नव्हे तर एकूणच व्यक्ती म्हणून माझे जीवन समृद्ध झाले. देशासाठी आपण पदक जिंकू शकतो. आपला खेळ त्या दर्जाचा आहे, असा आत्मविश्वास त्या स्पर्धेने मला दिला. 
शब्दांकन : मुकुंद पोतदार

संबंधित बातम्या