हजारी मनसबदार प्रज्ञेशची यशस्वी सलामी

मुकुंद पोतदार
Friday, 8 March 2019

भारताचा प्रतिभाशाली टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन याने एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धेत विजयी पदार्पण केले. या डावखुऱ्या जिगरबाज टेनिसपटूने इंडियन वेल्समधील स्पर्धेत फ्रान्सच्या बेनॉईट पैरेला 7-6 (7-5), 6-4 असे हरविले. प्रज्ञेशने त्याच्या फोरहँडचा भेदक वापर केला. याबरोबरच प्रज्ञेशने नव्या मोसमात वैयक्तिक तसेच भारतीय टेनिसमध्ये आणखी एक माईलस्टोन गाठला.

भारताचा प्रतिभाशाली टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन याने एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील स्पर्धेत विजयी पदार्पण केले. या डावखुऱ्या जिगरबाज टेनिसपटूने इंडियन वेल्समधील स्पर्धेत फ्रान्सच्या बेनॉईट पैरेला 7-6 (7-5), 6-4 असे हरविले. प्रज्ञेशने त्याच्या फोरहँडचा भेदक वापर केला. याबरोबरच प्रज्ञेशने नव्या मोसमात वैयक्तिक तसेच भारतीय टेनिसमध्ये आणखी एक माईलस्टोन गाठला.

जागतिक क्रमवारीत प्रज्ञेशचा 97वा, तर बेनॉईटचा 69वा क्रमांक आहे. एक तास 30 मिनिटांत दोन सेटमध्ये प्रज्ञेशने विजय मिळविणे विशेष आहे. पहिल्या सेटमध्ये प्रज्ञेशने दोन वेळा पिछाडीवरून पडूनही ब्रेकची भरपाई केली. मग त्याने टायब्रेक जिंकला. याचा अर्थ या पातळीवर सरस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अटीतटीच्या क्षणी दडपणावर मात करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मग दुसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेशने पहिला ब्रेक नोंदविताना पाचव्या गेममध्ये बेनॉईटची सर्व्हिस खंडित केली. 3-2 अशा आघाडीनंतर त्याने सर्व्हिस गमावली. त्यामुळे 3-3 अशी बरोबरी निर्माण झाली, पण नवव्या गेममध्ये प्रज्ञेशने ब्रेक नोंदविला. मग सर्व्हिस आरामात राखत विजय साकार केला.

प्रज्ञेशच्या कामगिरीची चर्चा करताना सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो त्याच्या प्रवेशाचा. त्याने पात्रता फेरीत दोन सामने जिंकून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. एटीपी मास्टर्स 1000 ही मालिका ग्रँड स्लॅमखालोखाल महत्त्वाची मानली जाते.

यानंतर प्रज्ञेशच्या प्रतिस्पर्ध्याकडे वळूयात. बेनॉईटने एक नोव्हेंबर 2011 रोजी जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. तो त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे. तो टॉप ट्वेंटीमधील खेळाडू आहेच, पण गुणवत्तेचे क्षमतेमध्ये रुपांतर केल्यास तो टॉप टेनच्या दर्जाचा आहे, असेही म्हणता येईल. गेल्या वर्षी त्याने नोव्हाक जोकोविचला मायामीत एटीपी मास्टर्स 1000 मालिकेच्या स्पर्धेत हरविले होते. एक तास सात मिनिटांत 6-3, 6-4 असे हरविले होते. तेव्हा जोकोविच ढोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन करीत होता याचा उल्लेख करावा लागेल, पण बेनॉईटचा हा निकाल दखल घेण्याजोगा नक्कीच आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत 2015 मध्ये अमेरिकन, तर 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन व विंबल्डनची चौथी फेरी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

बेनॉईट हा दर्जेदार टेनिसपटू असला तरी तो मुडी आहे. त्याच्याविरुद्ध प्रज्ञेशने नेहमीप्रमाणे शांतचित्ताने खेळ केला. मुडी प्रतिस्पर्धी जास्त धोकादायक असतात. प्रज्ञेशने आठ पैकी पाच ब्रेकपॉइंट वाचविले, तर सहा पैकी चार जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पदार्पण करताना प्रज्ञेश याच आघाडीवर कमी पडला होता.

प्रज्ञेश कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. लिअँडर पेस याच्यानंतर भारताचा टॉप हंड्रेडमध्ये प्रवेश केलेल्या निवडक खेळाडूंत त्याचा समावेश होतो. भारतीय टेनिस बारकाईने फॉलो करणाऱ्यांच्या अपवाद सोडल्यास सामान्य प्रेक्षकांसाठी त्याची वाटचाल अनपेक्षित आहे.
प्रज्ञेशचे जास्त कौतूक अशासाठी की त्याने सातत्य ठेवले आहे.

 कारकिर्दीतील सर्वोत्तम कालावधीचा तो पुरेपूर फायदा उठवितो आहे. प्रामुख्याने दुहेरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय टेनिसकरीता हे सुचिन्ह आहे.


​ ​

संबंधित बातम्या