इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलणे एका अर्थी बीसीसीआयसाठी फायद्याचेच

शैलेश नागवेकर
Wednesday, 15 July 2020

सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार होता.

नवी दिल्ली : आयपीएलचे भवितव्य अनिश्‍चित असताना आता परदेशी संघांचे भारत दौरेही संकटात सापडू लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार होता. परंतु हा दौरा पुढे ढकलला जाण्याची आता केवळ औपचारिकता राहिली आहे.

 कोरोनामुळे आता टेनिस जगतातील ही स्पर्धाही रद्द 

कोरोना महामारी नसती, तर पुढील महिन्यापासून भारतातील क्रिकेट सुरू होणे अपेक्षित होते. न्यूझीलंडचा अ संघ भारत दौऱ्यावर येणार होता. परंतु तोही रद्द होणे निश्‍चित आहे. भारतीय क्रिकेट मंडळाकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी येत्या काही दिवसांत ही घोषणा अपेक्षित आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या तरी कोणते क्रिकेट होणार नाही. येत्या शुक्रवारी बीसीसीआयच्या अपेक्‍स कॉन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत 'एफटीपी'वर (फ्युचर टूर प्रोग्राम) महत्त्वाची चर्चा होईल आणि त्या बैठकीत इग्लंड दौऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

नवी मुंबईतील फुटबॉलपटूंचा तयारीत नाही खंड

ब्रिटनच्या प्रसिद्धिमाध्यमांनी इंग्लंडचा हा दौरा पुढे ढकलला जाणार या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या 9 लाख कोरोनाबाधित आहेत. तर 25 हजार जणाने प्राण गेलेले आहेत. येत्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आला. तरीही सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होईल, अशीही शक्‍यता फारच धूसर आहे. 

भारतीयांचा अजून सरावच नाही 
इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सराव सुरू झाला आहे. मात्र भारतीय क्रिकेटपटू अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. ऑगस्टमध्ये खुल्या मैदानातील सराव सुरू करण्याचा विचार बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलून दाखवला होता. ते प्रत्यक्षात आले, तरी सप्टेंबरपर्यंत भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झालेले नसतील. 

...तर बीसीसीआयला 450 कोटींचा फटका 
तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेचा इंग्लंड दौरा रद्द होण्याऐवजी पुढे ढकलला जाण्याची शक्‍यता आहे. परंतु पुढच्या भरगच्च कार्यक्रमात ही मालिका होऊ शकली नाही आणि रद्द करण्याची वेळ आली, तर बीसीसीआयला 450 कोटींचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

आयपीएलसाठी मार्ग मोकळा 
इंग्लंडचा हा भारत दौरा पुढे ढकलला जाणे बीसीसीआयच्या पथ्यावरही पडणारे आहे. ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आला आणि तो कालावधी आयपीएलसाठी मिळाला, तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा अडथळा आला असता, म्हणून इंग्लंड मंडळही दौरा पुढे ढकलून एका अर्थी बीसीसीआयला मदतच करणार असल्याचे बोलले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या