जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमची स्पर्धाही संकटात येईल: पेरी

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

स्पर्धा रद्द झाल्यास इतर स्पर्धेच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होईल, असेच संकेत महिला क्रिकेटर्सच्या वक्तव्यावरुन मिळतात.  

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाली तर त्याचा फटका पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्वचषकाला बसेल, असे मत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिस पेरी हिने व्यक्त केले आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत ही स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली तर ऑस्ट्रेलियाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कठिण प्रसंगातून सावरत प्रेक्षकांशिवाय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला तरी ऑस्ट्रेलियन बोर्डाला फटका बसणार आहे. या स्पर्धेसंदर्भात आयसीसीने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र स्पर्धा रद्द झाल्यास इतर स्पर्धेच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होईल, असेच संकेत महिला क्रिकेटर्सच्या वक्तव्यावरुन मिळतात.  

सामन्याअगोदर फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळला अन्...

पुढील वर्षी 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान महिला विश्वचषक स्पर्धा नियोजित आहे. (मर्यादित षटकांची) या स्पर्धेचे यजमानपद न्यूझीलंडला मिळाले आहे. न्यूझीलंड हा कोरोनामुक्त होणारा पहिला देश आहे. असे असले तरी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेची झळ महिलांच्या आगामी विश्वचषक स्पर्धेला बसू शकते. एका इंग्लिश वेबसाइटने पेरीचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयावर महिला विश्वचषकाचे गणित अवलंबून असेल. जर पुरुषांची टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय झाला तर त्याचा परिणाम आमच्या (महिला विश्वचषक स्पर्धेवर) होईल. आयसीसीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दोन्ही स्पर्धा एकत्र घेणे शक्य नाही. सध्याच्या घडीला स्पर्धेसंदर्भात भाष्य करणे कठिण आहे, असे म्हणत तिने ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

कोरोनाचा विळखा घट्ट होत असलेल्या देशात खेळ सुरु करणं घोडचूक ठरेल : रोनाल्डो

मार्चमध्ये महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा पार पडली होती. ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेवेळी पेरी जायबंदी झाली होती. आपल्या पुनरागमनाबाबतही तिने भाष्य केले. लॉकडाउननंतर खेळ लवकरात लवकर सुरु व्हावे असे वाटते. मात्र दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याशिवाय मैदानात उतरणार नाही, असे तिने सांगितले. पेरीने ऑस्ट्रेलियाकडून 8 कसोटी, 112 एकदिवसीय आणि 120 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या