पहिल्या दिवशी सुवर्णाची अपेक्षा

पुजा घाटकर
Sunday, 19 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताला पदकाचे आशास्थान असलेल्या नेमबाजी स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय, तसेच विश्‍वकरंडक स्पर्धेत आम्ही भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करीत असल्यामुळे ही पदकांची आशा बाळगणे काही गैर नाही. भारतीय नेमबाज चाहत्यांची नक्कीच निराशा करणार नाहीत.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताला पदकाचे आशास्थान असलेल्या नेमबाजी स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय, तसेच विश्‍वकरंडक स्पर्धेत आम्ही भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करीत असल्यामुळे ही पदकांची आशा बाळगणे काही गैर नाही. भारतीय नेमबाज चाहत्यांची नक्कीच निराशा करणार नाहीत. या स्पर्धेत स्पर्धा खडतर आहे, पण आपले नेमबाज त्यासाठी तयार आहेत. या स्पर्धेनंतर आठवडाभरात ऑलिंपिक पात्रतेसाठी महत्त्वाची असलेली जागतिक स्पर्धाही आहे, पण लागोपाठ दोन स्पर्धा खेळण्याची आपल्या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे नक्कीच सवय आहे. 

भारताने पहिल्या दिवशीच सुवर्णपदकाचे खाते उघडल्यास नवल नसेल. आपल्या दोन आघाडीच्या जोड्या मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत कस पणास लावतील. रवी कुमार आणि अपूर्वी चंडेला हे दहा मीटर एअर रायफलच्या, तर मनू भाकर आणि अभिषेक वर्मा हे दहा मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदकाचे नक्कीच दावेदार आहेत. रवी आणि अपूर्वाची सरावातील कामगिरी, स्पर्धेस जाताना असलेला आत्मविश्‍वास बघितला, तर त्यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगल्यास वावगे ठरणार नाही. एअर रायफल या प्रकारात भारतीयांनी यापूर्वी अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. अजूनही संघ निवडीसाठी कमालीची चुरस असते. या प्रकारातील भारतातील आघाडीच्या सात-आठ स्पर्धकांत काही दशांश गुणांचा फरक असतो. काहीशी याच तोडीची स्पर्धा आशियाई स्तरावर होत असते. काही दशांश गुणांच्या फरकाने पदकाचा निर्णय होतो. 

मनू भाकर सध्या खूपच बहरात आहे. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने चांगले यश मिळवले आहे. तिचा सहकारी अभिषेक कडव्या स्पर्धेनंतर भारतीय संघात आला आहे. मनू वयाने लहान असली, तरी तिचा आंतरराष्ट्रीय अनुभव खूपच आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिंपिक यांसारख्या क्रीडा स्पर्धांकडे देशवासीयांचे जास्त लक्ष असते. या स्पर्धेच्या वेळी अन्य सहकारी क्रीडापटूही भेटत असतात, पदकाची अपेक्षा व्यक्त करीत असतात. त्याचे दडपण जास्त असते, पण मनूला याचा अनुभव राष्ट्रकुल स्पर्धेत मिळाला आहे. त्या स्पर्धेत तिने सुवर्णवेध घेतला होता. आता नक्कीच मनू-अभिषेक भारतीय नेमबाजीतील पदकाची मोहीम सुवर्णपदकाने करू शकतात. 

नेमबाजांचे लक्ष आपल्या कामगिरीवर पूर्णपणे केंद्रित असले, तरी रेंजचा कामगिरीवर परिणाम होतोच. इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धा होणारी रेंज मी बघितलेली नाही. पण, त्याचे फोटो नक्कीच पाहिले आहेत. त्यावरून ती नक्कीच चांगली दिसत आहे. आपल्या सर्वच नेमबाजांना या रेंजवरील सरावाची संधी लाभली आहे. ते नक्कीच पदकाचा वेध घेण्यास सज्ज आहेत. त्यांच्या पदकासाठी, चांगल्या कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा!

संबंधित बातम्या