कटकची कामगिरी महाराष्ट्राच्या बास्केटबॉलसाठी 'टॉनिक'

नरेंद्र चोरे
Tuesday, 10 September 2019

येथे नुकत्याच झालेल्या 46 व्या राष्ट्रीय सबज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवूनही महाराष्ट्राच्या मुलींना सुवर्णपदक जिंकता आले नसले, तरी दोन्ही गटांत पदके जिंकणे, ही महाराष्ट्रासाठी फार मोठी उपलब्धी ठरली आहे. स्पर्धेतील चमकदार कामगिरी भविष्यात महाराष्ट्राच्या मुला-मुलींसाठी टॉनिकचे काम करणार ज्युनियर व सिनियर गटातील स्पर्धांमध्ये निश्‍चितच खूप फायदा होणार आहे.

कटक (ओडिशा) : येथे नुकत्याच झालेल्या 46 व्या राष्ट्रीय सबज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवूनही महाराष्ट्राच्या मुलींना सुवर्णपदक जिंकता आले नसले, तरी दोन्ही गटांत पदके जिंकणे, ही महाराष्ट्रासाठी फार मोठी उपलब्धी ठरली आहे. स्पर्धेतील चमकदार कामगिरी भविष्यात महाराष्ट्राच्या मुला-मुलींसाठी टॉनिकचे काम करणार ज्युनियर व सिनियर गटातील स्पर्धांमध्ये निश्‍चितच खूप फायदा होणार आहे. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले यांनीही ही बाब मान्य केली. 

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्यपदक, तर मुलांच्या संघाने ब्रॉंझपदक पटकाविले. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या मुलींनी बलाढ्य तमिळनाडूकडून 56-87 गुणांनी पराभव पत्करावा लागला. साखळी फेरी व त्यानंतर उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी ज्याप्रकारे शानदार प्रदर्शन केले, ते लक्षात घेता मुली सुवर्णपदकाच्या हकदार होत्या. दुर्दैवाने त्यांना तमिळनाडूचे आव्हान पेलता आले नाही. मध्यांतरापर्यंत बरोबरीची टक्‍कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींनी तिसऱ्या क्‍वॉर्टरमध्ये महत्त्वाच्या क्षणी चुका केल्याने सामना हातून निसटला. तमिळनाडूने नेमक्‍या या संधीचा फायदा घेत सामन्यावरील पकड मजबूत करून सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

सुवर्णपदकाची हुरहूर मनात राहणार असली तरी, स्पर्धेतील एकूण कामगिरी निश्‍चितच शानदार राहिली. मुलींसह मुलांनीही सुरुवातीच्या धक्‍क्‍यानंतर ब्रॉंझपदक पटकावून स्पर्धेवर अमिट छाप सोडली. दोन्ही गटांत पदके जिंकणारा महाराष्ट्र स्पर्धेतील एकमेव संघ होता, हे उल्लेखनीय. महाराष्ट्राच्या यशात नागपूरकर खेळाडूंचे उल्लेखनीय योगदान राहिले. मुलींमध्ये कर्णधार समीक्षा चांडक व गुंजन मंत्रीने सर्वच सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. मुलांच्या संघाचा कर्णधार सार्थक धुळधुळेनेही प्रभावित केले. अचूक संघनिवड, "मॅच प्रॅक्‍टिस' आणि सराव शिबिरादरम्यान झालेली पुरेशी तयारी, या सर्व गोष्टींमुळेच हे शक्‍य झाले. 

स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंना खूप काही शिकायला मिळाले. देशभरातील तुल्यबळ संघांशी स्पर्धा करताना आपण नेमके किती पाण्यात आहोत, हे त्यांना कळून चुकले. शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर स्टेडियममध्ये खेळल्याचा अनुभव खेळाडूंना मिळाला. त्यामुळे कटकमधील स्पर्धा युवा खेळाडूंसाठी "टॉनिक' आणि महाराष्ट्र बास्केटबॉलच्या इतिहासात खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरेल, असे मानायला हरकत नाही. 

"शानदार कामगिरी करूनही महाराष्ट्र मुलींचा संघ सुवर्णपदक जिंकू शकला नाही, याची मनात कुठेतरी सल राहीलच. मात्र, लागोपाठ सहा सामने जिंकून "फायनल'मध्ये धडक मारल्यानंतर मुली "फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरल्या. तथापि मुलींसह मुलांनीही स्पर्धेत पदक जिंकणे, ही महाराष्ट्रासाठी आनंद व अभिमानाची बाब ठरली.' 
-शत्रुघ्न गोखले, मुख्य प्रशिक्षक, महाराष्ट्र


​ ​

संबंधित बातम्या