Pro Kabaddi 2019 : प्रदीप नरवालचा विक्रम; चढाईत गाठला हजार गुणांचा टप्पा

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

पाटणाकडून आज झालेल्या एकूण 46 चढाईंपैकी 25 चढाया एकट्या प्रदीपने करताना 26 गुणांची कमाई केली आणि प्रो लीगच्या मोसमात विक्रमी एक हजार गुणांचा टप्पा ओलांडला.

प्रो-कबड्डी : कोलकता : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात प्रदीप नरवालच्या आणखी एका 'सुपर' कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्‌स संघाने सोमवारी (ता.9) अखेर पराभवाची मालिका खंडित केली. पाटणा संघाने तमिळ थलैवाज संघावर 51-25 असा विजय मिळविला.

पाटणाकडून आज झालेल्या एकूण 46 चढाईंपैकी 25 चढाया एकट्या प्रदीपने करताना 26 गुणांची कमाई केली आणि प्रो लीगच्या मोसमात विक्रमी एक हजार गुणांचा टप्पा ओलांडला. माजी विजेत्या पाटणा संघाने सहा पराभवानंतर विजयाला गवसणी घातली. पाटणाने आज मोठ्या फरकाने विजय मिळविला असला, तरी त्यांच्या अखेरच्या स्थानात काही फरक पडलेला नाही. माजी विजेत्यांचा यंदा 14 सामन्यातील हा चौथाच विजय ठरला. तमिळ संघाला आज पुन्हा एकदा अजय ठाकूर आणि मोहित चिल्लर यांची अनुपस्थिती जाणवली. राहुल चौधरीला सूर गवसला नाही. पण, अजित कुमारने आणखी एक सुपर टेन कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात युपी योद्धाज संघाने आपली आगेकूच कायम राखताना गुजरात फॉर्च्युन जाएंटस संघावर 33-26 असा विजय मिळविला. श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल, रिशांक देवाडिगा यांच्या चढायांपेक्षा सुमीत, नितेशकुमार आणि आशु यांचा बचाव त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. गुजरातकडून सचिन तवर आणि सुनिल कुमार यांनाच काय तो प्रतिकार करता आला. युपी योद्धाज संघाने सातव्या विजयासह आता पहिल्या सहा संघात स्थान भक्कम केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या