भारताच्या लाजिरवाण्या पराभवामागे पाकिस्तानी क्रिकेटपटू

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

चौथ्या कसोटीत भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या फिरकीवर नाचविणाऱ्या इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या गोलंदाजीला धार निर्माण करण्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकचा मोठा वाटा आहे.

साउदम्पटन : चौथ्या कसोटीत भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या फिरकीवर नाचविणाऱ्या इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या गोलंदाजीला धार निर्माण करण्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकचा मोठा वाटा आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेत मोईन अलीचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश नव्हताच. पण, चौथ्या आणि महत्त्वाच्या कसोटीसाठी इंग्लंडने त्याचा संघात समावेश केला. कौंटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. त्याचाच फायदा त्याला या सामन्यात झाला. त्याचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम इंग्लंडचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी केले. इंग्लंड क्रिकेट मंडळानेही दोन वर्षांपूर्वीच त्यांना आपल्या संघासोबत जोडून घेतले आहे. भारतीय फलंदाज फिरकीवर चांगली फलंदाजी करत असल्याचे सर्वांनाच परिचीत असून, आता हीच भारतीय फलंदाजांची मजबूत बाजू कमजोर बनली आहे. 

मोईन अलीने आपल्या फिरकीवर भारतीय फलंदाजांना नाचवत दोन्ही डावात नऊ फलंदाजांना बाद केले. त्याने पहिल्या डावात 40 धावांची खेळीही केली होती. सहा फूट मोईनच्या कारकिर्दीतील हा 51 वा कसोटी सामना होता. त्याने आतापर्यंत 142 बळी मिळविलेले आहेत.  तसेच 2544 धावाही केल्या आहेत. 

या विजयानंतर सकलेनने ट्विट करत म्हटले आहे, की इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी केलेल्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मोईन अली तुझ्या अप्रतिम कामगिरीचा मला आनंद आहे. तुझ्यावर जबाबदारी टाकली की तू ती पूर्ण करतोच.


​ ​

संबंधित बातम्या