Asia Cup 2018 : पाकिस्तान भारतावर पलटवार करायला तयार

सुनंदन लेले
Saturday, 22 September 2018

साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करायला उत्सुक आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. फाजील प्रयत्न करताना पाकिस्तानचे खेळाडू चुकले ज्याचा फायदा भारतीय संघाने उचलला.

दुबई : साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करायला उत्सुक आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. फाजील प्रयत्न करताना पाकिस्तानचे खेळाडू चुकले ज्याचा फायदा भारतीय संघाने उचलला. रविवारी होणार्‍या सामन्यात पाकिस्तान संघ परत त्याच चुका करणार नाही आणि भारतीय संघाला टक्कर देईल असे भाकीत केले जात आहे.

अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने रविवारचा भारत वि पाकिस्तान सामना मोलाचा आहे. आशिया कप स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात भारत वि हाँगकाँग आणि शुक्रवारी झालेला पाकिस्तान वि अफगाणिस्तान हे दोनच सामने रंगले बाकीचे सामने अगदीच एकतर्फी झाले. शुक्रवारच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने कठोर मुकाबला करायला पाकिस्तान संघाला भाग पाडले. कठीण समय येता अनुभव कामासी येतो हे शोएब मलिकने दाखवून दिले. भारतासमोरच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी योजनेनुसार खेळ करावा उगाच हिरो बनायची घाई करून नये असे प्रशिक्षक मिकी आर्थर ओरडून सांगत आहे.

‘‘साखळी सामन्यात गडबड अशी झाली की काही खेळाडू भारतासमोर पहिल्यांदा खेळत होते. साहजिकच अनुभव नसलेल्या खेळाडूंना भारतासमोरच्या सामन्यात चाहत्यांच्या अपेक्षा कश्या वाढतात याची जाणीव नव्हती. प्रत्येकाला संघाकरता काहीतरी कमाल करून दाखवायची होती. त्या विचारातच गणित चुकले. योजनेपेक्षा आम्ही फार लांब गेलो. रविवारच्या सामन्यात त्या चुका टाळायच्या आहेत. संयम ठेवायचा आहे. भारतीय संघ ताकदवान आहे त्यांना पराभूत करायचे असेल तर 100 षटके सर्वोत्तम खेळ करावा लागेल असे मी खेळाडूंना समजावून सांगतो आहे’’, मिकी आर्थर म्हणाले.

दुबई स्पोर्टस् सिटीमधल्या स्टेडियमवरची खेळपट्टी दिसते तेव्हढी फलंदाजीला सोपी नाहीये. पहिली गोलंदाजी करताना चेंडू पटकन बॅटवर येतो आणि दुसर्‍या डावात खेळपट्टी मंदावत जाते असे दिसून आले आहे. दोन वेळा भारतीय संघाने पहिली गोलंदाजी करताना चांगला मारा केला आहे. रवींद्र जडेजा संघात आल्याचा फायदा झाला आहे. पाकिस्तानला पराभूत करायचे झाल्यास त्यांच्या वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळून देता कामा नये हे भारतीय फलंदाजांना समजले आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत फलंदाजी करत आहेत. 

पाकिस्तान संघ अजून म्हणावा तसा सर्वोत्तम फॉर्ममधे दिसलेला नाही. फलंदाजीत अजून गडबड होत आहे. भारतीय गोलंदाज त्याच कमजोरीचा फायदा उचलायच्या तयारीत आहेत. रविवारचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिमाखाने प्रवेश करणार आहे.  भारत वि पाकिस्तान सामन्याला सर्वात जास्त मागणी असल्याने संयोजकांनी ही लढत कामाच्या दिवशी ठेवण्याचे धाडस केले आहे. अजून बर्‍यापैकी तिकिटे रविवारच्या सामन्याची उपलब्ध असल्याचे समजले आहे.

संबंधित बातम्या