पाक संघाच्या पराभवानंतर अख्तरला आठवली भारत-पाक यांच्यातील फाळणी

सुशांत जाधव
Monday, 10 August 2020

पहिल्या डावात 69 धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरलेल्या बाबर आझमला सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आपल्यात आहे ते दाखवून द्यावे लागेल, असेही अख्तरने म्हटले आहे.

पाकचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरला पाकिस्तान संघाच्या इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर भारत-पाक फाळणीची आठवण झाली आहे. फाळणीवेळी देशाकडून ज्या चुका झाल्या तसाच काहीसा प्रकार पाकिस्तान संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात घडला, असे शोएब अख्तरने म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 107 धावांची आखाडी घेतल्यानंतर पाकला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन पाक संघावर टीका केली आहे. यात त्याने म्हटलंय की, पाकिस्तानी संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण त्यांनी तिच चूक केली जी देशाची फाळणीवेळी झाली. फलंदाजांमुळे संघावर नामुष्की ओढावली. संघाला सक्षम भागीदारीची गरज होती. स्टोक्सच्या गोलंदाजीवर थांबून खेळण्याची गरज होती. 350-400 धावसंख्या उभारण्याची संधी गमावली. एकाही स्टार खेळाडूने धावा केल्या नाही, त्यामुळेच पराभवाची वेळ आली. 107 धावांची आघाडी घेऊनही सामना जिंकता येत नसेल तर तुम्ही कितीही मोठे फलंदाज असला तरी निरुपयोगी ठरता, असा टोलाही त्याने आघाडीच्या फलंदाजांना लगावला आहे.  

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

पहिल्या डावात 69 धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरलेल्या बाबर आझमला सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आपल्यात आहे ते दाखवून द्यावे लागेल, असेही अख्तरने म्हटले आहे. यावेळी त्याने पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या शान मसूदचे कौतुक केले. त्याने आपली जबाबदारी पुर्ण केली होती. पण इतरांनी त्याला साथ दिली नाही, असे अख्तरने म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानी संघ दुसऱ्या डावात 169 धावांत आटोपला होता. जोस बटलर आणि क्रिस वोक्सच्या दमदार भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने पहिला कसोटी सामना 3 गडी राखून खिशात घालत मालिकेत आघाडी घेतली आहे.  इंग्लंडचा अर्धा संघ अवघ्या 117 धावात गारद झाल्यानंतर बटलर-वोक्स जोडीने मोलाची भागीदारी रचत विजयावर शिक्कामोर्तब केले होते.  


​ ​

संबंधित बातम्या