आयपीएलला खो घालण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने खेळला हा डाव

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य अजून पूर्णपणे निश्चित झाले नसताना, कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक स्पर्धा पार पाडण्यात येणार असल्याचा दावा पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनाचा निर्णय, ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच घेण्यात येणार आहे. यंदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्याच्या कोरोना स्थितीमध्ये या स्पर्धेवर रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. आणि अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

'कोरबो लोरबो जीतबो रे..'साठी शाहरूख-गंभीरमध्ये हे ठरलं होतं तर...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आल्यास, त्याठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पण आता यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या  क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी याबाबत बोलताना, श्रीलंका अथवा यूएई या देशांमध्ये यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. कराची येथे आयोजित पत्रकार परिषदेत वसीम खान यांनी आशिया चषक स्पर्धेबद्दल माहिती देताना, पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावरून २ सप्टेंबरला परतल्यानंतर, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आशिया चषक स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य अजून पूर्णपणे निश्चित झाले नसताना, कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक स्पर्धा पार पाडण्यात येणार असल्याचा दावा पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने केला आहे. श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे आणि त्यामुळेच  यंदाची आशिया चषक स्पर्धा तेथे घेता येणे शक्य असल्याचे वसीम खान यांनी सांगितले. व तसेच श्रीलंकेने या स्पर्धेच्या आयोजनाला नकार दिल्यास यूएई मध्ये ही स्पर्धा घेता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठीचा पाकचा निम्मा संघ कोरोना बाधित 

दरम्यान, यंदाच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तर यापूर्वी कोणत्याही स्थानिक स्पर्धेसाठी आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यास आपली परवानगी नसल्याचे पाकिस्तानच्या बोर्डाने म्हटले होते. तसेच पाकिस्तानच्या संघातील दहा खेळाडूंना काल कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यासह आगामी मालिकांवर सध्या तरी प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.    

 

                 


​ ​

संबंधित बातम्या